समृद्धी महामार्गावर अपघात (फोटो सौजन्य- social media)
संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथून समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जात असलेल्या आयशर चालकाला डुलकी लागली. अशातच त्याने फलकाच्या लोखंडी खांबाला धडक दिली. या अपघातात आयशरचालक जागीच ठार झाला असून, क्लीनर जखमी आहे.
समृद्धी महामार्गावर सोमवारी मध्यरात्री 2.20 वाजताच्या सुमारास दुसरबीड टोलनाक्याजवळील नागपूर कॉरिडोरवर आयशर (एमएच 20/ इजी-5075) संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथून नागपूरच्या दिशेने जात होता. वाहनचालक गणेश गायकवाड (40, रा. बिडकीन, जिल्हा संभाजीनगर) यांना सदर टोलनाक्याजवळ डुलकी लागली. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन दुसरबीड इंटरचेंजजवळ लागलेल्या आयसी-12 च्या फलकाच्या लोखंडी खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात चालक गणेश गायकवाड जागेवरच ठार झाला व बाजूला बसलेले मच्छिंद्र क्षीरसागर (रा. पांग्रा, जिल्हा संभाजीनगर) गंभीर जखमी झाले.
हेदेखील वाचा : Pahalgam Terror Attack: “विजय वडेट्टीवार यांनी निर्लज्जपणाचे…”; शिवसेनेचे मुंबईत जोरदार आंदोलन
अपघात झाल्याची माहिती मिळताच तत्काळ समृद्धी महामार्गावरील यंत्रणा 108 अॅम्बुलन्सचे डॉ. मंगेश काळे, चालक सुभाष पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ जखमींवर प्राथमिक उपचार केला. तसेच क्यूआरव्ही टीम दुसरबीड येथील श्रीकृष्ण बच्छिरे, तुषार तांदळे, नितीन बिसेन व पवन काळे यांनी वाहनात अडकलेल्या मृताला कटरच्या साहाय्याने पत्रा कापून बाहेर काढले. महामार्ग पोलिसचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश पवार, पोलिस हेडकॉन्स्टेबल रोशन शेख, संदीप किरके, अरुण भुतेकर व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान पवन सुरूसे, जयकुमार राठोड यांनी सदर अपघातग्रस्त आयशर क्रेनच्या मदतीने महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमीला पुढील उपचारासाठी सिदंखेडराजा येथे रवाना केले.
महामार्ग पोलिसांची सूचना
समृद्धी महामार्गावर वाहनचालकांनी वाहन चालविताना शक्यतो 2 चालक सोबत घेऊनच वाहन चालवावे. यादरम्यान पुरेशी विश्रांती व झोप घ्यावी. जेणेकरून एका चालकाला झोप आली तर दुसरा चालक वाहन चालवू शकतो. त्यामुळे होणारे अपघात टळू शकतील. त्याबाबत महामार्ग पोलिसचे प्रभारी अधिकारी एपीआय संदीप इंगळे व टीम दररोज चालक व प्रवाशांना प्रबोधन करत आहेत.