अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे 'जनआंदोलन' (Photo Credit- X)
महापालिकेने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सोमवार, २७ एप्रिल रोजी शहानुरवाडी येथील सोमवार बाजारात जनआंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ‘चला चला बाजाराला चला’ या घोषवाक्याखाली हे आंदोलन करण्यात आले. हातात विविध आशयाचे फलक, बॅनर घेत शिवसैनिकांनी महापालिकेच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. ‘गरीबांचा हक्क हिरावू देणार नाही’, ‘बाजार बंद करू देणार नाही’, ‘बिल्डरशाहीचा धिक्कार असो’, ‘गरिबांचा रोजगार वाचवा, आठवडी बाजार सुरू ठेवा’, ‘जनतेच्या रोजगारावर गदा आणू नका’, ‘मनपाचा धिक्कार असो’, ‘बिल्डरांच्या घशात भूखंड घालू नका’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या.
चला.. चला… बाजाराला चला…!!! आठवडी बाजार बंद करण्याच्या विरोधात शिवसेनेचे भव्य जनआंदोलन छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.. शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करत निषेध व्यक्त… pic.twitter.com/zv9NytZwTD — Ambadas Danve (@iambadasdanve) April 27, 2026
यावेळी दानवे म्हणाले, आठवडी बाजार बंद करून संबंधित भूखंड खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे. हा निर्णय सर्वसामान्य नागरिक आणि लहान विक्रेत्यावर अन्याय करणारा आहे तसेच सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. भाजपच्या सत्तेखालील मनपा प्रशासनाने बिल्डरांना फायदा पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतला असून भाजपाच्या फायद्यासाठी याचा उपयोग केला जाणार असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. महापालिकेत भाजपची सत्ता असून सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक हा बाजार बंद करण्यासाठी हुकुमशाही पद्धतीने धोरण आखत आहे. मात्र, या निर्णयामुळे हजारो लहान विक्रेत्यांचा रोजगार आणि उदरनिर्वाह धोक्यात आला असून या जुलूमशाही विरोधात आगामी काळात निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा दानवे यांनी दिला.
आंदोलनादरम्यान शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला विक्रेते व छोट्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला. अनेक विक्रेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. एका वयोवृद्ध भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिलेने मनपाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘आमचा उदरनिर्वाह या बाजारावर चालतो. बाजार बंद झाला तर आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित केला. तर एका ज्येष्ठ विक्रेत्याने, ‘आता या वयात आम्ही दुसरा कोणता धंदा करणार’ असा सवाल केला.






