काही तालुक्यांमध्ये पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली असली, तरी काही तालुक्यांमध्ये मात्र पाणीपातळी कमालीची खालावल्याचे चित्र आहे. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता भूजल पातळीत सरासरी १.०४ मीटरने वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी पावसाने चांगलीच हजेरी दिली होती. धरण, नदी नाले, प्राणी प्रकल्पांमध्ये तुडुंब पाणीसाठा जमा झाला होता. पाणीपातळीत याचा परिणाम दिसून आला.
दरम्यान, यावर्षीच्या नोंदीनुसार पैठण तालुक्याला सर्वाधिक दिलासा मिळाला असून, येथील पाणीपातळीत तब्बल २.७३ मीटरने मोठी वाढ झाली आहे. त्याखालोखाल गंगापूर तालुक्यात १.७३ मीटर आणि वैजापूर तालुक्यात १.५१ मीटर पाणीपातळी वाढली आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या छत्रपती संभाजीनगर भागात मात्र ०.०५ मीटर अशी किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे. एकीकडे काही तालुक्यांत पाणीपातळी सुधारली असताना दुसरीकडे सिल्लोड, सोयगावसह ५ तालुक्यांत पाणीपातळीत घट झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.
सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ०.९९ मीटरने पाणीपातळी खालावली आहे. यासोबतच सोयगाव तालुक्यात ०.९८ मीटर, खुलताबाद तालुक्यात ०.८२ मीटर, कन्नड तालुक्यात ०.६२ मीटर आणि फुलंब्री तालुक्यात ०.२९ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. जिल्ह्याची सरासरी पाणीपातळी १.०४ मीटरने वाढली असली, तरी सिल्लोड, सोयगाव आणि खुलताबाद या भागांतील घट पाहता मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात या भागात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्याची सरासरी पाणीपातळी १.०४ मीटरने वाढली असली, तरी तालुकानिहाय चढ-उतार खालीलप्रमाणे स्पष्ट दिसून येतात:
| पाणीपातळीत वाढ झालेले ४ तालुके | वाढ (मीटरमध्ये) | पाणीपातळीत घट झालेले ५ तालुके | घट (मीटरमध्ये) |
| पैठण | + २.७३ | सिल्लोड | – ०.९९ |
| गंगापूर | + १.७३ | सोयगाव | – ०.९८ |
| वैजापूर | + १.५१ | खुलताबाद | – ०.८२ |
| छत्रपती संभाजीनगर | + ०.०५ | कन्नड | – ०.६२ |
| — | — | फुलंब्री | – ०.२९ |






