छत्रपती संभाजीनगरसाठी अभिमानाचा क्षण (Photo Credit - X)
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहराच्या मानात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकत्याच एका भाषणात भारताचा प्राचीन सागरी इतिहास आणि जगाशी असलेले सांस्कृतिक व व्यापारी संबंध यांचा अभिमानाने उल्लेख केला. यावेळी त्यांनी अजिंठा लेणीतील जहाजाच्या भित्तिचित्राचा विशेष उल्लेख करून भारताच्या सागरी वैभवाचे आणि जागतिक व्यापारातील प्राचीन भूमिकेचे कौतुक केले.
प्राचीन सागरी वैभवाचे जिवंत चित्रण
अजिंठा लेणीतील हे चित्र प्राचीन भारताचा समुद्रमार्गे व्यापार, जहाजबांधणी तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे जिवंत चित्रण करते. या चित्रामध्ये दिसणारे जहाज तीन उंच मस्तूलांसह आणि तीन आयताकृती पालांनी सुसज्ज आहे. जहाजाच्या पुढील व मागील भागावर उंचावलेली नावे असून, नेव्हिगेशनसाठी स्टिअरिंग ओअर्स (सुकाणू) वापरलेले दिसतात. ही कलाकृती स्पष्टपणे दर्शवते की, प्राचीन भारतातील जहाजबांधणी आणि समुद्रमार्गे व्यापार किती प्रगत होता.
इतिहास आणि संदर्भ
इतिहासतज्ज्ञांच्या मते, हे चित्र अजिंठा लेणीतील गुहा क्रमांक १७ मध्ये आढळते. हे चित्र ५व्या शतकातील असून, बौद्ध जातक कथांमधील व्यापारी प्रवासाचे दृश्य दाखवते. हे चित्रण केवळ धार्मिक नसून, प्राचीन भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीचे प्रतीक आहे.
खुशखबर! Pune–Chhatrapati Sambhajinagar प्रवास होणार सुसाट; राज्य सरकारचा ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर
आंतरराष्ट्रीय मान्यता आणि प्रेरणा
या चित्राला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठे महत्त्व मिळाले आहे. ‘वर्ल्ड हिस्ट्री एन्सायक्लोपीडिया’ आणि ‘नॅशनल हेराल्ड इंडिया’सारख्या जागतिक प्रकाशकांनी यावर विशेष लेख प्रकाशित केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय नौदलाने बांधलेल्या आयएसएसव्ही कौंडिण्य या पारंपरिक सेल (शीड) जहाजाच्या डिझाइनलाही याच अजिंठा चित्रातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले जाते.
नौदलाने तयार केली जहाजाची प्रतिकृती
पुरातत्व अभ्यासक संजय पाईकराव यांनी यावर अधिक माहिती दिली. प्रिन्स ऑफ वेल्स वस्तू संग्रहालयाचे संचालक मोतीचंद्र यांनी ‘सार्थवाह’ नावाचे पुस्तक लिहिले आहे, ज्यात या चित्राचा उल्लेख आहे. समुद्रातील जहाजांवर येणारे संकट दूर करण्याचे काम करणारा अवलोकितेश्वर (पद्मपाणी) नावाचा बोधिसत्व होता, अशी मान्यता आहे. या पद्मपाणीचे चित्रही जहाजाच्या चित्रात दाखवले आहे. याच जहाजाची प्रतिकृती भारतीय नौदलाने ‘कौंडिण्य’ नावाचे जहाज म्हणून तयार केली आहे.
पंतप्रधानांनी केलेला हा उल्लेख केवळ भारताच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा सन्मान करत नाही, तर छत्रपती संभाजीनगरचा कालातीत खजिना असलेल्या अजिंठाच्या कलात्मक आणि ऐतिहासिक वारशाकडेही जागतिक लक्ष वेधतो. हे चित्र म्हणजे भारताच्या प्राचीन जागतिक संबंधाचा आणि शतकांपूर्वी बहरलेल्या व्यापार, संस्कृती आणि कारागिरीच्या कथा सांगणाऱ्या वारशाचा खरा पुरावा आहे.






