दिल्ली स्फोटानंतर संभाजीनगर 'हाय अलर्ट'वर! (Photo Credit - X)
छञपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): विदेशी पर्यटकांची रेलचेल असलेली ठिकाणे अतिरेक्यांनी रेकीनंतर घातपात घडवण्याच्या उद्देशाने ‘हिटलीस्ट’ वर घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. दरम्यान, हरियाणा मध्ये सापडलेला शस्त्रसाठा आणि दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाची घटना पाहता यंञणेला आधीच माहिती मिळाली होती. यामुळे विदेशींची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी काही घटना घडू शकत असल्याने पोलिसांनी याठिकाणी ‘मॉकड्रील’ घेत तपासणी केली.
NSG कमांडोचा तीन दिवसीय दहशतवादविरोधी सराव
अहमदाबादमध्ये अलीकडेच एटीएसने केलेल्या मोठ्या कारवाईनंतर देशभरातील संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली. जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि संवेदनशील ठिकाणे असलेल्या वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि रामा इंटरनॅशनल हटिल परिसरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी) आणि स्थानिक पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय दहशतविरोधी सराव मोहीमेला महत्व प्राप्त झाले आहे. ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या सरावाचे नेतृत्व मुंबई एनएसजी ग्रुपचे कमांडर कर्नल अभिषेक सिंग यांनी केले. या सरावात एनएसजीचे १५० कमांडो, शहर व ग्रामीण पोलिस दल, एटीएस, सीआयडी (गुप्तवार्ता विभाग), अग्निशमन दल आदी सहभागी झाले होते.
शहरात फिक्स पॉइंट अन् झाडाझडती
दिल्ली बॉम्बस्फोटामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. १९ वर्षापूर्वी वेरूळला शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक शहरे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होती. त्यात संभाजीनगरात येणाऱ्या विदेशी पर्यटकांचा लोढा जास्त असल्याने यावेळी तीच खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे रात्री वाहनांची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय विमानतळ, रेल्वेस्थानक, पर्यटनस्थळे येथील बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. मागे झालेल्या दहशतवादी कारवायामध्ये ज्या संशयितांचा सहभाग होता, त्यांची नव्याने झाडाझडती करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेने विविध पथकांना दिल्याचे दिसत आहे. विशेषतः विमानतळाची सुरक्षा वाढवण्यावर भर दिला जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच विदेशी पर्यटकाना घेऊन डेक्कन ओडीसा पर्यटक रेल्वे शहरात दाखल झाली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत वेरूळ-घृष्णेश्वर परिसरात एनएसजी सराव झाल्याने प्रशासनाने सजगतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर हे देशातील संवेदनशील शहराच्या यादीत असल्याने या सरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तीन दिवस चाललेल्या सरावानंतर, या मोहिमेमुळे भविष्यातील दहशतवादविरोधी कारवाई अधिक परिणामकारक ठरेल. शहरातील ऐतिहासिक स्थळांवर सुरक्षा यंत्रणा, तांत्रिक साधनसामग्री आणि प्रतिसादक्षमता यांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. एनएसजी कमांडो आणि पोलिस दलांनी दिलेल्या सहकार्याबद्दल छत्रपती संभाजीनगर पोलिस दलाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा: Delhi Bomb Blast : दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर






