मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपला दावा सांगितला होता. मात्र, त्याआधीच शिवसेनेने नवी खेळी खेळत काँगेस, राष्ट्रवादीला चितपट केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सहीचे पत्र शिवसेना खासदार प्रवक्ते अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांंना दिले आहे. यात विरोधी पक्ष नेते पदासाठी औरंगाबादचे ( संभाजी नगर) विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांच्या नाव देण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असे अंबादास दानवे यांची ओळख सर्वाधिक काळ जिल्हाप्रमुख राहिलेले नेते अशी आहे. जिल्हाप्रमुख, विधान परिषद सदस्य ते शिवसेना प्रवक्ते अशा तिहेरी भूमिकेत असलेले दानवे यांची औरंगाबाद जिल्यातील संघटना बांधणी आणि ती एकसंध ठेवण्यात मोठी भूमिका आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट सामील झाल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या बालेकिल्याचा ढासळणारा बुरुज राखण्यासाठी अंबादान दानवे यांची विरोधी पक्ष नेते पदावर वर्णी लावण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
विधान परिषदेतील आमदारांचे संख्याबळ पहाता या पदासाठी शिवसेनेने अंबादास दानवे यांचे नाव निश्चित केले असले तरी कॉंगे्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. मविआतील अन्य पक्षांनी सहमती दर्शवल्यास अंबादास दानवे यांच्या गळात विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.