गडचिरोलीत जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार
अहेरी येथे महिला-बाल रुग्णालयाचे लोकार्पण
सिरोंचात रुबी रुग्णालयाचे भूमिपूजन
गडचिरोली: “गडचिरोलीचा चेहरा झपाट्याने बदलत असून औद्योगिकतेसोबत आता आरोग्य क्षेत्रातही क्रांती घडत आहे, व त्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा दक्षीण गडचिरोलीत उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी येथे १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण आणि सिरोंचा येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या अत्याधुनिक ३५० खाटांच्या हॉस्पिटल आणि कॉलेज कॅम्पस प्रकल्पाचे भूमिपूजन आज संपन्न झाले.
यावेळी राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बीदरी, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचा आजचा दिवस ‘आरोग्य क्रांती दिवस’ म्हणून नोंदविला जाईल, कारण येथे औद्योगिक विकासाबरोबर आरोग्य सेवेतही क्रांतिकारक बदल घडत आहेत. अहेरी येथील १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय हे खाजगी रुग्णालयांनाही लाजवेल इतके अत्याधुनिक बनले असून, येथे मातृत्व, बाल आरोग्य आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यासोबतच भामरागड तालुक्यातील कोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, जरावंडी व ताडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन, वेंगनुर उपकेंद्र आणि रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचेही लोकार्पण करण्यात आले. तसेच, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, धानोरा, कुरखेडा, कोरची व सिरोंचा या तालुक्यांतील नव्या सार्वजनिक आरोग्य पथकांचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
Gadchiroli Rising: Advancing Healthcare, Infrastructure, and Women Empowerment for a Stronger Future Dedicated various new healthcare facilities in Gadchiroli district today, marking a transformative moment for the region’s medical infrastructure. The new Women and Child… https://t.co/1CZlxJB27A pic.twitter.com/uqMBB93ygN — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 8, 2025
त्याचप्रमाणे, सिरोंचा तालुक्यातील राजेश्वरपल्ली येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री म्हणाले की, रुबी हॉस्पिटल हे जागतिक स्तरावरील रूग्णांची सेवा देण्यासाठी ओळखले जाते आणि आता त्याच दर्जाची सुविधा गडचिरोलीत उपलब्ध होणार आहे. यामुळे गडचिरोलीतील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, पुणे किंवा मुंबई गाठण्याची गरज उरणार नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील रुग्णांना या अत्याधुनिक सेवेचा लाभ घेता येणार आहे. या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता वाढवून २४०० आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. हॉस्पिटलसोबतच येथे वैद्यकीय व नर्सिंग कॉलेज आणि शाळाही सुरू होणार असल्याने स्थानिक युवक-युवतींना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोह प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्हा ‘देशातील स्टील हब’ बनत आहे, पण या औद्योगिक विकासासोबतच गडचिरोलीला ‘ग्रीन हब’ बनवायचे आहे. त्यासाठी पाच कोटी झाडांच्या लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. दळणवळण सुधारण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले असून, पूल व नाले बांधकामाची कामेही वेगाने सुरू आहेत.






