जामखेड : मतदारसंघातील कुपोषित बालकांना संतुलित पोषण आहार मिळावा तसेच मातांना समुपदेशन मिळावे या उद्देशाने सुरू केलेला शारदा पोषण अभियान या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा बुधवारी मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झाला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. या उपक्रमाद्वारे प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवातीला जामखेड तालुक्यातील ०-६ वयोगटातील कुपोषित बालकांना पोषण आहाराचा पुरवठा करणे, नवजात बालकांच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजना तसेच गर्भवती आणि नवजात शिशूंच्या मातांना संतुलित पोषण, आरोग्यविषयक घ्यायची काळजी तसेच समुपदेशन करण्यात येईल.
कर्जत व जामखेड तालुक्यातील भागात शिक्षणाच्या अभावामुळे अनेक मातांना पोषण आहाराबाबत अपुरी माहिती असते. त्यांना समुपदेशन व मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्या बाळाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काय काय आवश्यक आहे याबाबतची प्राथमिक माहिती सुद्धा मातांना नसते. तसेच आर्थिक परिस्थितीमुळे सुद्धा पालक आपल्या बालकांना संतुलित पोषण आहार पुरवू शकत नाही त्यामुळे कुपोषणासारखे गंभीर प्रश्न उद्भवतात. या ०-६ वयोगटातील बालकांचे SAM , MAM, SUW, MUW असे वर्गीकरण केले जाते. SAM व SUW म्हणजे तीव्र कमी वजनाची मुले यांच्यासाठी शासनाकडून अतिरिक्त आहार पुरवला जातो. मात्र मध्यम कुपोषित म्हणजे MAM वर्गातील बालकांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त आहार दिला जात नाही मग अशा बालकांचे वजन कमी होऊन ते तीव्र कुपोषणात जाण्याची शक्यता वाढते, त्यामुळे शारदा पोषण अभियानाच्या माध्यमातून मध्यम वजनाच्या मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
०-६ वयोगटातील या सर्व बालकांना WHO च्या विहित मार्गदर्शिकेनुसार कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड यांच्या माध्यमातून दोन वेळा संतुलित पोषण आहार दिल्या जाईल. तसेच मातांना पोषण आहाराबाबत योग्य मार्गदर्शन व समुपदेशन केले जाईल. कर्जत जामखेड तालुक्यात एकूण ६६२ अंगणवाड्या आहेत.
सदर उपक्रम अंतर्गत सुरुवातीला १५८ अंगणवाड्यातील ३१८ बालकांना पोषण आहार दिल्या जाणार आहे. या प्रसंगी मिशन वात्सल्य आणि बालसंगोपन या दोन्ही योजना कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रभावीपणे राबवल्याबद्दल मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्तुती देखील केली.
[read_also content=”परळीच्या मिरवट गावात २२ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, अवघ्या ३ तासात आरोपींना केली अटक https://www.navarashtra.com/maharashtra/22-year-old-married-woman-gang-raped-in-mirwat-village-of-parli-accused-arrested-in-just-3-hours-nrdm-273983.html”]
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती कुंदन, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेडचे संचालक डॉ. रवी आरोळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज ससे, तालुका महिला व बालविकास अधिकारी श्रीमती बेल्हेकर व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.