पुणे – आम्हाला सावित्री घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या ज्योतिबांचा शोध मात्र जारी आहे. असे ज्योतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, असे वक्तव्य भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे. यामुळे आता नवीनच वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील हळदी-कुंकाच्या कार्यक्रमामध्ये चित्रा वाघ बोलत होत्या.
विरोधकांची टीका
चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावर विरोधक लगेचच तुटून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर आक्रमकपणे टीका केली आहे. इतर विरोधकांकडून चित्रा वाघ यांना लक्ष्य केले जात आहे. हळदी-कुंकाच्या कार्यक्रमामध्ये चित्रा वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मघाशी चंद्रकांत दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. हा एक नवीन पायंडा दादांच्या माध्यमातून घातला गेला. पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे.
पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा शुभेच्छा देते, सक्षम भारतामध्ये पीएम मोदी यांचे व्हिजन नारी शक्तीला पुढाकार देणारे आहेत. असेही चित्रा वाघ म्हणाल्या.