File Photo : Chandrashekhar Bawankule
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना उद्देशून गंभीर इशारा दिला आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या अपमानाची राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवावे, असा इशारा दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विधान केले होते. त्याचा मुद्दा आता भाजपने उपस्थित केला आहे. बावनकुळे यांनी म्हटले की, ‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाचवेळा अपमान केला. त्यांनी अजूनही त्यांची भूमिका बदलली नाही. अजूनही ते माफी मागण्यासाठी तयार नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या सर्व वक्तव्यांबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी माझी मागणी आहे. तेव्हाच त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवावे, असे सांगितले.
फौजदारी तक्रार दाखल
यापूर्वी वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘माझे आजोबा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळेच मी राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे’, असे सात्यकी यांनी ट्विट करून म्हटले होते.
राहुल गांधींचं विधान काय?
ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत. सावरकर हे इंग्रजांची माफी मागणारे आहेत, असे राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान म्हटले होते.