काँग्रेसकडून राज्यभरात आज काढले जाणार मशाल मोर्चे; जनजागृतीही केली जाणार (संग्रहित फोटो)
मुंबई : भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिले आहेत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडची जमीन दिलेली आहे, कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीन दिली आहे आणि वांद्र्यातील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही देऊन टाकली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत व विधिमंडळच अदानीला देण्याचे बाकी आहे, ते कधी देणार आहात, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्याला मदत करण्यासाठी भाजपा युती सरकारकडे पैसे नाहीत. लाडकी बहिण योजनेतून भगिनींना देण्यास पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत परंतु अदानीला देण्यासाठी मात्र भाजपा युती सरकार तत्पर आहे. एवढे सर्व अदानीच्या पदरात टाकून महाराष्ट्राला काय मिळणार आहे तर फक्त भोपळा, असे सांगून सपकाळ यांनी मदर डेअरीची जमीन अदानीला देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली.
गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकावर बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपा युती सरकार राज्यात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे उकरून काढत असते. आता या सरकाच्या गृविभागाने राज्यातील मंदिर, मशिदी, गुरुद्वारा, चर्च अशा सर्व प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पिकरसाठी एक फतवा जारी केला आहे. प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश घालून दिलेले असताना राज्य सरकारने वेगळा फतवा काढून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, हा फतवा मागे घ्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच शेताच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी करणार आहेत व या पाहणीनंतर राज्यपाल महोदयांना भेटून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले आहे.