सांगली: शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी अमरावतीच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली. राज्यभरात भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाईसाठी आंदोलनंही होत आहेत. अशातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रतिमेवर रविवारी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक करीत वक्तव्याचे समर्थन केले.
या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये रविवारी सकाळी शिवप्रतिष्ठानचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. अमरावती येथे महात्मा गांधी यांच्याबाबत गुरूजींनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचा आरोप करण्यात येत असला तरी आरोप करणार्यांनी मूळ चित्रफित पाहून खात्री करावी. काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक भिडे यांच्याविरूध्द चिखलफेक करण्यात येत आहे. अमरावती येथे गुन्हा दाखल झाला असला तरी आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण, जाणीवपूर्वक गुरूजींचा होत असलेला अवमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा यावेळी हणमंतराव पवार यांनी दिला. अविनाश सावंत यांनीही यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते कायमपणे भिडे गुरूजींच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची ग्वाही दिली.