पुणे : दौंड शुगर कारखान्याची चालू गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, शासनाच्या धोरणानुसार १५ ऑक्टोबर पर्यंत कारखाना सुरू करणार आहे. तसेच त्यापूर्वी उस उत्पादकांना किमान आधारभूत किमतीपोटी राहिलेलं देणंही पूर्ण करणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.
मागील गाळप हंगामात दौंड शुगर साखर कारखान्याने १२ लाख ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. किमान आधारभूत किमतीपोटी साखर कारखाना २९१० रुपये प्रति टनाने उस उत्पादकांना देणे देण्यासाठी आज अखेर २७७५ रुपये प्रति टनाप्रमाणे उस उत्पादकांना पेमेंट दिले आहे. उर्वरित १३५ रुपये प्रति टनाप्रमाणे देणे कारखाना सुरू होण्यापूर्वीच उस उत्पादकांना देण्यात येणार आहेत.
ट्रॅक्टर व ट्रक मालकांशी करार
चालू वर्षी उस वाहतुक व तोडणीसाठी ४०० ट्रॅक्टर व ट्रक मालकांशी व ३५० बैल टायर गाडी बरोबर करार करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर वेळेवर कारखाना सुरू होईल, परंतु पाऊस पडला तर गाळप हंगाम सुरू होण्यास थोडासा विलंब होऊ शकतो, अशी माहिती जगदाळे यांनी दिली.
उसाला जादा दर देण्याची मागणी
दौंड शुगर कारखान्याची मागील वर्षी गाळप झालेल्या उसाला किमान आधारभूत किंमत सर्वाधिक आहे. परंतु, ऊस पिकाचा उत्पादन खर्च, खताच्या वाढत्या किमती याचा विचार करुन कारखाना प्रशासनाने तेवढ्यावरच न थांबता अधिकचा दर द्यावा, अशी मागणी उसउत्पादकांकडून केली जात आहे.