पुणे : झेड ब्रिजखालील नदीपात्राच्या झाडीत गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणाच्या खूनाचा छडा लावण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे. अवघ्या १२ तासात तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, मामाच्याच मुलाने खून केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कौटुंबिक व मालमत्तेच्या वादातून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे, असे पोलिसांनी सांगितले.
नरेश गणेश दळवी (वय ३०, रा. उर्से, ता. मावळ), अजय शंकर ठाकर (वय २५) आणि समीर कैलास कारके (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश सुरेश कदम (वय ३६) असे नदीपात्रात खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत गणेश यांचे वडील सुरेश कदम (वय ६१) यांनी तक्रार दिली आहे.
गणेशला दारूचे व्यसन होते. तो लॉन्ड्री चालक होता. आरोपींनी खूनाचा कट रचला होता. रविवारी तिघे उर्से येथून पुण्यात आले. त्यांनी गणेश याला दारू पिण्यासाठी म्हणून बोलावून घेतले. यापूर्वी देखील मामाचा मुलगा व गणेश दारू पिलेले होते. त्यामुळे गणेश देखील दारू पिण्यास आला. रात्री नऊच्या सुमारास त्यांनी एका दुकानातून दारू घेतली. त्यानंतर ते दारू पिण्यासाठी नदीपात्रातील झाडीत बसले. एकत्र दारू पिले. पण, गणेश याला दारूची नशा झाल्याने तो शुद्धीत नव्हता. त्यातच आरोपींनी कोयत्याने त्याच्या गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून त्याचा खून केला. त्यानंतर हे तिघेही तेथून पसार झाले होते.
[read_also content=”बीएमडब्ल्यूमधील तरुणीला अश्लील शेरेबाजी..! कारची केली तोडफोड https://www.navarashtra.com/maharashtra/the-young-woman-in-the-bmw-made-obscene-remarks-car-vandalized-nrdm-330510.html”]
वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे, महिला सहाय्यक निरीक्षक कल्याणी पाडोळे व त्यांचे पथक गुन्ह्याचा तपास करत होते. घटना स्थळाची पाहणी व तांत्रिक तपास केला. आरोपींची माहिती मिळाली. तर परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले होते. त्यानूसार, या तिघांनीच त्याला मारले असल्याचा संशय आला. लागलीच सहाय्यक निरीक्षक कल्याणी पाडोळे व त्यांच्या पथकाने उर्से गाव गाठले. तेथून या तिघांना पकडत त्यांच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्यांनी खूनाची कबूली दिली.