महालॅब्स योजनेत विलंब; तपासणी अहवाल उशिरामुळे रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत अडथळे
जिल्ह्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयासह ६ उपजिल्हा रुग्णालये, ६ ग्रामीण रुग्णालये तसेच ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधून दररोज मोठ्या प्रमाणात रक्त नमुने संकलित केले जातात. केवळ मागील महिन्यातच सुमारे २१ हजार रुग्णांच्या एक लाखाहून अधिक तपासण्या करण्यात आल्याची नोंद आहे. मात्र, या तपासण्यांचे अहवाल वेळेत उपलब्ध होत नसल्याची तक्रार रुग्णांकडून सातत्याने होत आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
सद्यस्थितीत स्थानिक स्तरावर रक्त नमुने घेऊन ते जिल्हा मुख्यालयातील महालॅब्स प्रयोगशाळेत पाठवले जातात. तपासणीनंतर अहवाल मोबाईलवरील लिंकद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवला जातो. या संपूर्ण प्रक्रियेस किमान २४ तासांचा कालावधी लागत असून, प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यास दोन दिवसांपर्यंत विलंब होत असल्याचे वास्तव आहे.
यातच सुट्ट्यांच्या काळात नमुन्यांची प्रक्रिया अधिकच संथ होते. त्यामुळे तातडीच्या रुग्णांनाही अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागत असून उपचारात विलंब होण्याचा धोका वाढतो. परिणामी, आरोग्य सेवेच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
राज्य शासन व एचएलएल लाइफकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जात असून, शासकीय रुग्णालयांमध्ये १०० हून अधिक प्रकारच्या तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना दिलासादायक ठरत असली तरी स्थानिक अंमलबजावणीत गतीचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.
तज्ज्ञांच्या मते, प्राथमिक व ग्रामीण स्तरावरच काही महत्त्वाच्या तपासण्या उपलब्ध करून दिल्यास तसेच नमुना वाहतूक आणि अहवाल वितरण प्रणाली अधिक सक्षम केल्यास विलंब टाळता येऊ शकतो.
दरम्यान, रुग्णांना वेळेत निदान व उपचार मिळावेत यासाठी महालॅब्स योजनेतील अहवाल वितरण प्रक्रिया वेगवान करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, मोफत सुविधा असूनही तिचा अपेक्षित लाभ रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांतून नमुने आमच्याकडे येण्यास वेळ लागतो. त्यानंतर परीक्षण व विश्लेषण करून अहवाल तयार करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागतो. करारनाम्यानुसार ही प्रक्रिया निश्चित आहे. त्यामुळे काही तासांत अहवाल देणे सध्या शक्य नाही,अशी प्रतिक्रिया महालॅब्सचे प्रयोगशाळा व्यवस्थापक सागर समदाळे यांनी दिली.






