पाटणमध्ये घंडागाड्या न आल्यामुळे सर्वत्र कचरा आणि भटके कुत्र्यांचा त्रास होतो आहे (फोटो - सोशल मीडिया)
पाटण : शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरानजीक विक्रमनगर परिसरात असणाऱ्या कचरा डेपोतील कचरा रात्री-अपरात्री अज्ञात व्यक्ती पेटवून देत असल्याने आजूबाजूला वास्तव्यास असणारे नागरिक व परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यास्तव ४ दिवसांपासून स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांनी कचरा डेपोत कचरा टाकण्यास मज्जाव केल्याने कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या जाग्यावरच उभ्या आहेत. त्यामुळे पाटण शहरात कचरा गोळा करणाऱ्या गाड्या फिरल्या नाहीत. कचरा डेपोनजीक सी.सी.टी.व्ही. बसवावेत, कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई करावी, डेपोत कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी करत मुख्याधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत डेपोत कचरा टाकू दिला जाणार नाही, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
पाटण शहरालगत चाफोली रोड परिसरात स्टेडियमनजीक पाटण नगरपंचायतीने भाडेतत्त्वावर जागा खरेदी केली आहे. त्याठिकाणी पाटण शहरातील दररोजचा जमा होणारा कचरा डेपोत टाकला जातो. या कचरा डेपोच्या अनेक आसपास शेतकऱ्यांची शेती व आजूबाजूला घरे आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात उग्र वास व माशांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास होत असल्याने गेल्या काही वर्षापासून या कचरा डेपो विरोधात नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत. ज्या ठिकाणी वस्ती नाही त्या ठिकाणी कचरा डेपो हलवावा, अशी मागणी करत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी आंदोलनेही केली आहेत. यावर नगरपंचायत प्रशासनाने तोडगाही काढला होता.
‘५० खोक्यां’चे लाभार्थी संतोष बांगर? भाजप आमदारांच्या आरोपावर बांगर यांचे जोरदार प्रत्युत्तर
परिसरात भटक्या कुत्र्यांचाही वावर
सध्या रात्री-अपरात्री या कचरा डेपोला अज्ञात व्यक्ती आग लावत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरत आहे. वाऱ्यामुळे हा धूर आजूबाजूच्या घरात जात आहे. लहान मुले, ज्येष्ठांना श्वसनाचा त्रास होवू लागला आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढल्याने येथून ये-जा करणाऱ्यांवर ते हल्ले करत आहेत. कचरा डेपो उघड्यावर असल्याने प्लास्टिक पिशव्या अथवा इतर साहित्य वाऱ्यामुळे इतरत्र शेतात, रस्त्यावर विखुरले जात आहे. कचरा डेपोमुळे विक्रमनगर परिसरात दुर्गंधी पसरली असून मच्छर व माशांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रोगराई पसरू शकते. या सर्वांचा त्रास हा स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना होत असल्याचे कारण देत येथील कचरा डेपोला विरोध केला जात आहे.
परिसरात पसरले धुराचे लोट
या कचरा डेपोला अज्ञाताने आग लावल्याने परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा डेपोत कचरा टाकण्यास विरोध करत २ दिवसांपासून कचरा गाड्या अडवण्यात आल्याने त्या जाग्यावरच उभ्या आहेत. परिणामी २ दिवसांपासून पाटण शहरात कचरा गोळा करणाऱ्या गाड्या न फिरकल्याने घराघरात कचरा साठून राहिला आहे. त्यामुळे पाटण शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कचरा डेपोला आग लावणाऱ्यांवर कारवाई करावी, कचरा डेपोत सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवावेत, कचरा डेपोच्या ठिकाणी नगरपंचायतीने कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी करत जोपर्यंत मुख्याधिकारी येत नाहीत तोपर्यंत डेपोत कचरा टाकू दिला जाणार नाही, असा इशाराही स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता मुख्याधिकारी याबाबत काय निर्णय घेतात ते पहावे लागेल.
अदानी समुहाला आणखी एक कंत्राट; ‘मिठी’ प्रकल्पासाठी १७०० कोटी, निविदा प्रक्रियाही पूर्ण
याबाबत पाटण नगरपंचायत नगराध्यक्षा अनिता देवकांत यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून पाटणच्या कचरा डेपोचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. याच नाहक त्रास शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने कायमस्वरूपी जागा खरेदी करून त्याठिकाणी कचरा डेपो सुरू करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. कचरा डेपोसाठी शहरापासून बाहेर जागा उपलब्ध केली आहे. मात्र तेथेही काही शेतकरी अडवणूक करत आहेत. सध्याचा कचरा डेपो हा भाडेतत्त्वावर असून रात्रीच्या वेळेस त्याठिकाणी अज्ञात लोक कचरा डेपो पेटवून देत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कचरा डेपोला लागलेली आग विझविण्यात आली आहे. विनाकारण कचरा डेपोला आग लावणाऱ्याविरोधात पोलिसात तक्रारही केली आहे. कचरा डेपोच्या ठिकाणी लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवले जातील. नवीन कचरा डेपोचाही प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल.






