'पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा'; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला
अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या रामरक्षा आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंढरपूर दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे यांचे रामरक्षा आंदोलन हे “बेगडी प्रेम” असल्याचा आरोप केला.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी राज्यभर रामरक्षा आंदोलन सुरू केले आहे. मुंबई, ठाणे आणि नागपूरसह विविध शहरांमध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनातून मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येत असून रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचे आयोजन केले जात आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “पूर्वी रामभक्तांवर टीका करणारे आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणारे लोक आज रामरक्षा आंदोलन करत आहेत. त्यामुळे हे आंदोलन श्रद्धेपेक्षा राजकीय गरजेतून होत असल्याचा दावा त्यांनी केला. “आता पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा म्हणावी लागत आहे,” असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
दरम्यान, पंढरपूर दौऱ्यात शिंदे यांनी अन्य विषयांवरही प्रतिक्रिया दिली. डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण झाल्याच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत हिंसेचा निषेध केला. डॉक्टरांवर हल्ला करण्याचे समर्थन आपण कधीच केले नाही आणि भविष्यातही करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात संबंधितांवर आवश्यक ती कारवाई सुरू असून खासदार श्रीकांत शिंदे यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. कायद्यापुढे सर्व समान असून अशा घटनांबाबत सरकारची भूमिका ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
रामरक्षा आंदोलनावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. आगामी काळात हा मुद्दा आणखी राजकीय रंग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, दोन्ही बाजूंनी परस्परांवर सुरू असलेली टीका अधिक धारदार होताना दिसत आहे.






