सिडको : इंदिरानगर परिसरात एका सोळा वर्षीय युवतीला दोघांनी पाच मजली इमारतीच्या गच्चीवरून ढकलून दिले. यात गंभीर झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विद्या हनुमान काळे (१६) असे मयत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्री फिरवीत संशयित आरोपी विनायक सुरेश जाधव (१८) यास ताब्यात घेतले आहे. मयत विद्या हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. निकालाच्या आदल्या दिवशीच अशी घटना झाल्याने संपूर्ण काळे कुटुंबावर शोककळा पसरली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील कैलास नगर येथे (रा. व मूळचे सारोळा, ता. पाथरी, जि. परभणी) येथील हनुमान काळे हे पत्नी सविता आणि बारावीत असलेला मुलगा ओम आणि विद्यासह राहतात. (दि. ३१) रोजी सायंकाळी पत्नीसोबत ते भाजीपाला घेण्यासाठी लेखानगर येथे गेले होते. तर ओम ओझर येथे गेला होता. आठ वाजेच्या सुमारास ते परत आल्यानंतर घराच्या अंगणात अगदी त्यांच्या पुढ्यात त्यांची मुलगी विद्या धाडकन पडली. तातडीने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने तिला लेखानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही काळ ती बोलण्याच्या स्थितीत होती. त्यावेळी आई वडिलांनी नेमके काय झाले असे तिला विचारले असता दोघांनी तिला इमारतीच्या गच्चीवर नेले. पैकी एक ओळखीचा होता. त्यानेच धक्का देऊन मला खाली ढकलून दिल्याचे तिन्ही सांगितल्याचे पालकांनी पोलिसांना सांगितले.
रात्रभर तिने मृत्यूशी झुंज दिली. गुरूवारी (दि. १) रोजी दुपारी २ च्या सुमारास तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे आणि सहकाऱ्यांनी धाव घेत तपासाला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. दरम्यान विद्याच्या अंगावरील जखमा बघता आणि तिने तिच्या पालकांना दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शांतता प्रिय असलेल्या इंदिरानगर परिसरात अशी घटना घडल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निखिल बोंडे अधिक तपास करीत आहेत. मयत विद्या काळे हिने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल जाहीर झाला; यात ती उत्तीर्ण झाली असून तिला ५७% गुण प्राप्त झाले आहेत.