'इथं' QR Code च्या माध्यमातून होतीये कर वसूली; ग्रामपंचायतीचा हायटेक कारभार
अमळनेर : सध्या डिजिटल व्यवहार वाढताना दिसत आहे. कोणतेही व्यवहार करायचे असेल तर क्यूआर कोडचा वापर केला जात आहे. त्यातच तालुक्यातील गांधली ग्रामपंचायतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत घर क्रमांकऐवजी क्यूआर कोडद्वारे कर वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीने कर वसुली करणारी व सेवा पुरवणारी धुळे जळगाव व नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, नागरिकांना बऱ्याच गोष्टी घरबसल्या मिळाव्यात, या उद्देशातून स्थानिक प्रशासनाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक घराच्या दर्शनी भागात लावलेल्या क्यूआर कोडद्वारे घरपट्टी व पाणीपट्टी भरणा केला जाणार आहे. कर भरण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली राबविणारी व अत्याधुनिकतेकडे वाटचाल करणारी अमळनेर तालुक्यातील गांधली ग्रामपंचायत आधुनिक ठरली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रशासन अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि विश्वासहार्य होण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचायत क्षेत्राची डिजिटल परिवर्तनाकडे वाटचाल करणारी ही संकल्पना असून, नागरिकांना क्यूआर कोड स्कॅन करून थेट त्यांची मालमत्ता माहिती, चालू कर भरणा, थकीत कर भरणा, पावती डाऊनलोड व अॅप द्वारे ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. केवळ कर भरण्यासाठी याचा उपयोग न ठेवता घर मालकाला त्याच्या मिळकतीची संपूर्ण माहिती त्याच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी एन. आर. पाटील तसेच विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद पाटील, संगणक ऑपरेटर मंगेश मांडे व गांधली ग्रामपंचायतीच्या कार्यकारणीचे सदस्य यांच्या अनमोल सहकार्याने व गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद व एकमुखी पाठिंबा यामुळेच हा यशस्वी टप्पा ग्रामपंचायतीला गाठता आला, असे सांगण्यात आले आहे.