राज्यात उष्माघाताचा कहर! दोन महिन्यांत तब्बल 8 बळी, वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एरंडीमध्ये उष्माघातामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश इंगोले असे या तरूणाचे नाव आहे. महेश शेतात काम करून घरी परतला आणि त्यानंतर काही वेळातच तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला तात्काळ दवाखान्यात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. महेशचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शाहजानी परिसरात देखील उष्णता प्रचंड वाढली आहे. या ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 26 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लक्ष्मण शेतात काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
नाशिकहून परभणीत आलेल्या एका 37 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाजी बबन कांबळे असं या मृत्यू झालेल्या व्यक्तिचं नाव असून ही घटना 25 एप्रिल रोजी घडली आहे. शिवाजी नाशिकहून परभणीच्या नांदखेडा रोड भागात त्यांच्या भावाला भेटण्यासाठी आले होते. मात्र यावेळी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.
लातूरमधूल गोंद्री या ठिकाणी उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 25 एप्रिल रोजी घडली आहे.
अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यात उष्माघाताने एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 23 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. प्राथमिक शिक्षिका उषा फापाळे (वय 50) यांनी उन्हातून प्रवास केल्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितलं जात आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षिका उषा फापाळे यांची प्रकृती उष्माघातामुळेच खालावल्याची शक्यता आहे.
19 एप्रिल रोजी अमरावती जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ एक मृतदेह आढळला. या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची माहिती समोर आली आहे. किशोर वासनिक (वय 65) असं मृत्यू झालेल्या व्यक्तिचं नाव आहे.
Prabhani: सावधान! उन्हाचा वाढता धोका; परभणीत उष्माघाताने घेतला पहिला बळी, 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
हिंगोली बस्थानक परिसरात 15 एप्रिल रोजी एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. उष्माघाताने या व्यक्तिचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.
अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना 15 एप्रिल रोजी घडली. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.






