मुंबई, ठाण्यात मुसळधार
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. मान्सूनने महाराष्ट्राचा बराच भाग व्यापला असून, मुंबई-ठाण्यासह कोकणात बुधवारी पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसला. पुढील 3-4 दिवसांत राज्याच्या विविध भागांत दमदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कोकणसह राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकण, गोव्यातही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. मान्सूनने बुधवारी महाराष्ट्राचा बहुतेक भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागांत प्रवेश केला.
हेदेखील वाचा : Pune Monsoon News: मान्सूनपूर्व पावसानेच जिल्ह्याची दाणादाण; गेल्या सहा दिवसांतील पावसाची सरासरी, पाहा आकडेवारी
महाराष्ट्राच्या विविध भागांत गेल्या ५ दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून, १२ जखमी झाले आहेत. त्यात पाण्यात बुडून, वीज कोसळून तसेच भिंत कोसळून मृत्यू पावलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. काही प्राण्यांनाही याचा फटका बसला. राज्याच्या वेळेच्या सुमारे १२ दिवस आधी आलेल्या मान्सूनमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे.
अमरावती, बुलडाण्याला सर्वाधिक फटका
सुमारे ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यातील पिकांचा हाती-तोंडी आलेला घास निसर्गाने पळवला आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये पावसाचा अंदाज
तसेच पश्चिम बंगालचा उर्वरित भाग व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत छत्तीसगड, ओडिशासह ईशान्येकडील काही राज्ये, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकेल आणि उत्तर बंगालच्या उपसागरावर तीव्र दाब क्षेत्र निर्माण होईल. यामुळे पश्चिम बंगाल व ओडिशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
जनजीवन विस्कळीत
सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. पशूधनासह वित्त आणि जीवितहानीही होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.