हिंजवडी आयटी पार्कमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा (फोटो- सोशल मीडिया)
हिंजवडी आयटी पार्कमध्ये पायाभूत सुविधांची वानवा
आयटी कर्मचाऱ्यांचे आयुष्य विस्कळीत
पावसाळ्यात झाले हिंजवडीचे हाल बेहाल
पिंपरी: राज्याच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा चेहरा असलेल्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधा अक्षरशः ढासळल्या आहेत. खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, अवजड वाहनांचा त्रास आणि वाढते प्रदूषण या समस्यांनी आयटी कर्मचाऱ्यांचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या भागाला भेटी दिल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ राहिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.यंदाच्या पावसाळ्यात आयटी पार्कमधील रस्ते जलमय झाले होते. चिखल, पाणी आणि वाहतूक कोंडीने नागरिकांचा अक्षरशः जीव टांगणीला लागला होता. सोशल मीडियावर या परिस्थितीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक आणि आयटी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठका घेऊन उपाययोजनांची आश्वासने दिली; मात्र दोन महिन्यांनंतरही जमीनिवर काहीच बदल झालेला नाही.
‘मलमपट्टी’वरच प्रशासनाचे समाधान
सध्या केवळ खड्डे बुजविण्याचे किंवा तात्पुरते डांबरीकरणाचे काम सुरू असून, कोणत्याही मोठ्या दुरुस्तीचा किंवा नवीन रस्ता प्रकल्पाचा वेग दिसत नाही. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे रस्त्यांवर अवजड वाहने सर्रास फिरत आहेत. नुकत्याच एका सिमेंट मिक्सरच्या अपघातात आयटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतरच प्रशासन जागे झाले आणि बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईचे पाऊल उचलले.
हिंजवडी ‘IT पार्क’ घेणार मोकळा श्वास! वाढते अपघात रोखण्यासाठी PMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
प्रदूषणाने श्वास गुदमरतोय!
हिंजवडी व वाकड परिसरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकामांमुळे धुळीचे प्रदूषण गंभीर झाले आहे. त्यातच उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार नियमित सुरू आहेत. परिणामी, या भागातील हवेची गुणवत्ता सतत ‘खराब’ पातळीवर नोंदवली जात आहे. नागरिक आणि आयटी कर्मचारी आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत.
विभागांमध्ये ढकलाढकली सुरू आहे. डागडुजीऐवजी केवळ मलमपट्टीवर भर दिला जात आहे. दीर्घकालीन उपाययोजना दिसत नाही.
— पवनजित माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज
मुख्य मुद्दे
आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडी आणि खड्डेमय रस्त्यांचे साम्राज्य
बांधकाम प्रकल्पांमुळे धुळीचे आणि हवेचे प्रदूषण वाढले
अपघातांच्या घटनांनी वाढवली चिंता
प्रशासनाकडून फक्त ‘मलमपट्टी’ची कामे सुरू
नागरिक आणि आयटी कर्मचारी संतापले






