पाटस : दौंडमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात ५ ते त्यापुढील वयोगटातील सुमारे अडीच हजार स्पर्धकांनी ५ ते १० किलोमीटर तर १० ते २१ किलोमीटरचे अंतर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेते पदक व रोख रक्कम बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
दौंड येथील तालुका क्रीडा संकुल मैदानावर रविवारी (दि १०) मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पहाटे ५.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाले.
दौंड तालुका क्रीडा संकुल मैदानापासून ५ ते १० तसेच पुढे १० ते २१ किलोमीटर अंतरापर्यंत धावण्याची ही स्पर्धा पार पडली. यामध्ये ५ वर्षाच्या स्पर्धेकापासुन ८५ वयाच्या वृद्ध स्पर्धकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी दिल्ली, लोयडा, भोपाळ, बेंगलोर, बेळगाव गोवा तसेच राज्यातील पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर व इतर जिल्ह्यातील स्पर्धक आले होते. तर दौंड तालुक्यातील अनेक स्पर्धकांनी ही सहभाग घेतला होता.
बक्षिसांचे वाटप
स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, टाइमिंग चीप, टी-शर्ट व विजेते पदक तसेच प्रत्येक विजेता स्पर्धकांना ठरवण्यात आलेली रोख रक्कम अशी एकूण ३ लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला, अशी माहिती संयोजकांनी दिली. डॉक्टर रोहन खवटे रुग्णालय, भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय, माळवाडी (दौंड), रोटरी क्लब दौंड, पाटस, कुरकुंभ, दौंड तालुका क्रीडा शिक्षक संघटना तसेच दौंड स्पोर्ट फाउंडेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान, भाजप आमदार राहुल कुल यांनीही या स्पर्धेत सहभाग घेत ५ किलोमीटर अंतरापर्यंत धावण्याचा आनंद घेतला.