संग्रहित फोटो
पुणे : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी शुक्रवारी पुणे न्यायालयात मोठा दावा केला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी एक विधान केले होते. या विधानानंतर दाखल बदनामीप्रकरणातील खटल्यात दोषी नसल्याचा दावा गांधींच्या वकिलांनी केला आहे. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. विशेष न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील आरोप वाचून दाखवला. राहुल गांधी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नव्हते. त्यांची बाजू मांडणारे अॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी दोषी नाहीत, असा दावा यावेळी न्यायालयात केला. २९ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मागील सुनावणीत विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कथित बदनामीकारक वक्तव्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संदर्भ दिलेल्या पुस्तकाची प्रत न्यायालयात सादर करण्याची सात्यकी सावरकर यांची मागणी पुण्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणी खटला सुरू होण्यापूर्वी आरोपीला कोणतीही कागदपत्रे सादर करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही; अन्यथा राज्यघटनेच्या कलम २० (३) अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल, असे नमूद करून विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी, तक्रारदाराला कोणतीही माहिती देण्याचे बंधन आरोपीवर नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला होता.
हे सुद्धा वाचा : बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई कधी होणार? खोटी प्रमाणपत्र सादर करुन घेतली सवलत
काय आहे प्रकरण?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटन दौऱ्यात पाच मार्च २०२३मध्ये ‘ओव्हरसीज काँग्रेस’च्या मेळाव्यात भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या मित्रांसमवेत एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याने आनंद झाल्याचे एका पुस्तकात लिहिल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. त्यावर हे विधान खोटे आणि अवमानकारक असल्याची तक्रार सात्यकी सावरकर यांनी केली आहे.