महाराष्ट्र बजेट 2026 लाईव्ह सीएम देवेंद्र फडणवीसांनी चवदार तळे आणि बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या विकासासाठी घोषणा केली (फोटो - एक्स)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच राज्यातील महापुरुषांना अभिवादन करुन त्यांच्या स्मृतीस्थळांचा जिर्णोद्धार केला जाणार असल्याचे जाहीर केले. सर्व महापुरुषांना अभिवादन करुन त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा अर्थसंकल्प केवळ आगामी वर्षाचा जमाखर्च नाही तर विकसित महाराष्ट्राच्या प्रगती पथावरील महत्त्वाचा टप्पा आहे. आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत थोर समाजसुधारक आणि मानवी मुल्यांचे पुरस्कर्ते महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीला 11 एप्रिल 2027 रोजी 200 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 2026-27 या वर्षात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील आणि त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा
संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजना
त्याचबरोबर संत गाडगेबाबा यांचे 150 वे जयंती वर्षानिमित्त संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी आणि अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्रित जोडून संत गाडगेबाबा सर्किट विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ग्रामीण भागांच्या सर्वसमावेशक विकासासाठी संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबवण्यात येईल. तसेच संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेंतर्गत 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) च्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येईल. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रायगड जिल्हातील महाडमधील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीवर्षानिमित्त तेथील पायाभूत सुविधांकरिता विकास आराखडा तयार करण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातून केली आहे.
हे देखील वाचा : ही दोस्ती तुटायची नाही..! दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतींचे हे विशेष वर्ष लक्षात घेता 2026-27 हे वर्ष समाजिक, समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाईल. त्यांच्या कार्याचा गौरव करुन विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक निधी पुरवला जाईल,” असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसेच जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या देहूमधील जन्मस्थळाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा तयार केला जाईल अशी घोषणा करण्यात आली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरच पूर्ण
त्याचबरोबर दादरमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचा देखील मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केला. फडणवीस म्हणाले की, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या मुंबईमधील राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही योजना देखील राज्य सरकार सुरु करणार आहे. त्याची सविस्तर माहिती दिली जाईल,” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये सांगितले आहे.






