जालना : जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे, जालन्याच्या वेशीवरील गावात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. अशातच मनोज जरांगेपाटील यांनी एक गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपोषणामुळे तब्येत खालवल्याने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी आंदोलनावर आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं नाही. उलट ओबीसींचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ओबीसी समाजाचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे. काही गोष्टी घडू लागल्या की लक्षात येतं. अगोदरच्या आणि आताच्या आंदोलनात मोठा फरक आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलकांना भेटायला येणं हे सर्व नियोजित आहे. हे ठरवून सुरू आहे. ही राजकीय नेत्यांची चळवळ आहे हे लक्षात येते. सरकार ठरवून डाव टाकत आहे. पण त्यांनी कितीही डाव टाकले तरी एक दिवस हे त्यांच्याच अंगलट येणार आहे. काहीही घडले तरी मराठा समाज मागे हटणार नाही, आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला.
आज ना उद्या आमचं आणि त्यांच उपोषण संपणारच आहे. आम्ही पुन्हा एकमेकांसमोर येणारच आहोत. त्यामुळे तिकडे उपोषणाला बसलेल्या ओबीसी बांधवांना मी दोष देणार नाही. मी त्यांना विरोधक मानले नाही, त्यामुळे त्यांना उत्तर द्यायची गरज नाही.
मी मराठा समाजातील तरुणांना विनंती करतो, की आता आपल्याला आरक्षण मिळणार आहे. तुम्ही आत्महत्या करू नका. नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न करा. मी आरक्षण मिळवून देणारच. आरक्षण मिळाल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचा जीव महत्वाचा आहे. काळजी करू नका. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही.”, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.