सौजन्य - नवराष्ट्र टीम
माळशिरस : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांचे दौरेदेखील वाढले आहेत. अशातच आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी घोषणा केली आहे. माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माजी आमदार राम सातपुते यांच्याच नेतृत्वाखाली हाेतील, अशी घाेषणा गोरे यांनी केली आहे.
नातेपुते येथील मधूर मिलन मंगल कार्यालयात माजी आमदार राम सातपुते यांनी आयोजित केलेल्या कार्यकत्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आप्पासाहेब देशमुख, अकलुज भाजपचे मंडल अध्यक्ष सुजय माने पाटील, बाळासाहेब धाईंजे, मिलिंद सरतापे, राजकुमार हिवरकर आदी भाजप व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले की, मी गेले २० वर्षे आमदार व आता मंत्री आहे, मी कोणाच्या वाटेला जात नाही, माझ्या वाटेला कोणी गेलं तर मी सोडत नाही. मी कमरेवर वार करत नाही तर कमरेखाली वार करतो, असे म्हणत माळशिरस तालुक्यातील २२ गावांचा पाण्याचा प्रश्न भाजपच सोडवणार असल्याचा दावा गोरे यांनी केला.
माजी आमदारांचे लवकरच प्रवेश
मंत्री गाेरे म्हणाले, मला एका वर्षाचा हिशोब विचारणाऱ्यांनी ५० वर्षात काय केले, हे अगोदर सांगावे, तालुक्यातील भाजपच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे, हे विसरू नका असा गंभीर इशाराही गोरे यांनी दिला. लवकरच बबनराव शिंदे, दिलीप माने, राजन पाटील, यशवंत माने, रणजितसिंह शिंदे या नेत्यांचे भाजपात प्रवेश होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
माजी आमदार राम सातपुते यांनी विधानसभेला आपल्याला मिळालेली एक लाख आठ हजार मते ही भाजपच्या कार्यकर्त्यांचे बळ असल्याचे सांगितले. मात्र त्यामुळे विरोधकांना बीपीच्या गोळ्या चालू झाल्याचा आरोपही त्यांनी केला. पुढे बोलताना सातपुते म्हणाले, आपला पालकमंत्री एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणारा नाही. आगामी काळात माळशिरस तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांचा अकलूजच्या विजय चौकात भाजप प्रवेश होणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेवर भाजपचा, महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय कार्यकर्ते शांत बसणार नाही, असा निर्धार सातपुते यांनी व्यक्त केला.






