महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी आणि त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या वर्मा यांनी २०१८ ते २०२३ या कालावधीत त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्याकडे वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा अनुभव आहे. त्रिपुराच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहिलेल्या वर्मा यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला एक अनुभवी प्रशासकीय नेतृत्व मिळाले आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी (Maharashtra Governor) नियुक्ती झालेले जिष्णू देव वर्मा यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. 15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे जिष्णू देव वर्मा यांचा जन्म झाला. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काही काळ काम केल्यानंतर, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही वर्मा यांनी त्याठिकाणी भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी काम केले.
ज्या काळात त्रिपुरामध्ये भाजपला फारसा जनाधार नव्हता आणि राम मंदिर चळवळ शिखरावर होती, अशा कठीण काळात त्यांनी पक्ष विस्ताराची जबाबदारी स्वीकारली.जिष्णू देव वर्मा यांची क्षमता ओळखून भाजपने १९९३ मध्ये त्यांना राष्ट्रीय परिषदेत स्थान दिले आणि त्रिपुराचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त केले.
१९९६ मध्ये त्यांनी पूर्व त्रिपुरा आदिवासी राखीव मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर १९९८ ची विधानसभा आणि १९९९ ची लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली. या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले.
Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार; शरद पवारांसह विनोद तावडे, पार्थ पवारही
पराभूत होऊनही त्यांना मिळालेली २९% मते ही त्याकाळी त्रिपुरातील भाजपची सर्वोच्च मते होती. २०१५ मध्ये जेव्हा भाजपने ईशान्य भारतावर लक्ष केंद्रित केले, तेव्हा त्यांच्या प्रदीर्घ निष्ठेची दखल घेत त्यांची पक्षाच्या कोअर कमिटीत वर्णी लागली. बिप्लब कुमार देब यांच्या नेतृत्वाखालील काळातही त्यांनी पक्षाच्या मजबुतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
जिष्णू देव वर्मा हे केवळ एक अनुभवी राजकारणी नसून ते एक संवेदनशील कवी, चित्रकार आणि शिल्पकार देखील आहेत. त्यांनी ‘चिल्ड्रन ऑफ द वॉटर गॉडेस’ आणि ‘मास्टर ऑफ टाइम’ यांसारखी गाजलेली पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या या साहित्यिक आणि कलात्मक आवडीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे.






