पर्यटकांसह स्थानिक नागरिकांकडून उपक्रमाला प्रतिसाद
खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी अवकाश निरीक्षणाची आवड जोपासत अत्याधुनिक दुर्बीण खरेदी केली. पन्हाळ्याच्या निसर्गसंपन्न वातावरणाचा, स्वच्छ आकाशाचा आणि पर्यटनस्थळ म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्यांनी शिवतीर्थ उद्यान येथे या उपक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दुर्बिणीतून मंगळ, गुरु आणि शुक्र या ग्रहांचे तसेच त्याच्या उपग्रहांचे स्पष्ट दर्शन घडवले जात आहे. याशिवाय चंद्राचा पृष्ठभाग अगदी जवळून पाहण्याची संधी मिळत असल्याने याबाबत आकर्षण अधिकच वाढताना दिसत आहे.
रात्री आकाश निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी
विशेष म्हणजे स्वच्छ आकाशात तेजस्वी दिसणारा ‘सिरीयस’ हा तारा देखील या दुर्बिणीतून पाहता येत असून, आकाश निरीक्षणाचा हा अनुभव पर्यटकांसाठी संस्मरणीय ठरत आहे. ऐतिहासिक वारसा, थंड हवामान आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्हाळ्यात या उपक्रमामुळे ‘आकाश पर्यटन’ ही नवी संकल्पना आकार घेत आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांना दिवसभर ऐतिहासिक स्थळांची सफर केल्यानंतर रात्री आकाश निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम ज्ञानवर्धक ठरत असून, विज्ञानाविषयीची आवड निर्माण करण्यासही तो उपयुक्त ठरत आहे.
पन्हाळ्याच्या पर्यटनात एक वेगळी आणि आधुनिक भर घालणारा उपक्रम सुरू
या उपक्रमासाठी नाममात्र शुल्क आकारले जात असले तरी मिळणारा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. लोकांनी आकाश केवळ पाहू नये, तर ते समजून घ्यावे,हा या उपक्रमामागील उद्देश आहे. भविष्यात आणखी अत्याधुनिक दुर्बिणी उपलब्ध करून देत अधिक सखोल माहिती देण्याचा प्रयत्न राहील, असे इरफान मुजावर यांनी सांगितले. पन्हाळ्याच्या पर्यटनात एक वेगळी आणि आधुनिक भर घालणारा हा उपक्रम भविष्यात अधिक विस्तारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, ‘ता-यांची सफर’ ही संकल्पना आता पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.






