(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतातील कामगार कायद्यांमध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांनंतर, आता सर्वांचे लक्ष ‘सॅलरी स्लिप्स’वर केंद्रित झाले आहे. नवीन कामगार संहितेने म्हणजेच New Labour Code ने ‘वेतन’ या संकल्पनेला पूर्णपणे बदललं आहे. या बदलाचा सर्वात महत्त्वपूर्ण परिणाम कर्मचाऱ्यांच्या ‘हातात मिळणाऱ्या वेतनावर’आणि त्यांच्या भविष्यातील बचतीवर होण्याची अपेक्षा आहे. या बदलांमुळे नक्की कोणाचा फायदा होईल आणि कोणाचे बजेट बिघडेल, हे समजून घेणे आवश्यक आहे.
आता कर्मचाऱ्याचे ‘मूळ वेतन’ हे त्याच्या ‘एकूण मोबदल्याच्या’ किमान ५० टक्के असणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत, कंपन्या विविध कारणांमुळे मूळ वेतन अनेकदा कमी ठेवत असत; तर घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, बोनस आणि विशेष भत्ते यांसारख्या घटकांचा वाटा मात्र अधिक असायचा. नवीन नियमांनुसार, जर या विविध भत्त्यांची एकूण बेरीज एकूण मोबदल्याच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असेल, तर तो अतिरिक्त भाग देखील मूळ वेतनामध्ये समाविष्ट केला जाईल. मूळ वेतन आणि महागाई भत्त्यामध्ये होणाऱ्या या वाढीचा परिणाम पर्यायाने भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीसाठी दिल्या जाणाऱ्या योगदानावर होईल.
Moneycontrol च्या एका अहवालानुसार, TeamLease Services चे वरिष्ठ उपाध्यक्ष बालासुब्रमण्यम ए. यांनी असे नमूद केले आहे की, यातून मिळणारा प्रत्यक्ष लाभ हा कर्मचाऱ्याच्या सध्याच्या PF योगदानावर आणि त्याच्या सध्याच्या वेतन रचनेवर अवलंबून असेल. जर मूळ वेतन सध्या ‘CTC’च्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर नवीन नियमांनुसार ते वाढवले जाईल; यामुळे PF आणि ग्रॅच्युइटीमध्ये होणारी जमा रक्कम वाढेल खरी, परंतु परिणामी ‘हातात मिळणाऱ्या वेतनात’ मात्र कपात होऊ शकते. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आधीच ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांच्यावर या बदलाचा कोणताही विशेष परिणाम होणार नाही. याउलट, जर मूळ वेतन सध्या ५० टक्क्यांपेक्षा खूपच जास्त असेल आणि कंपनीने ते ५० टक्क्यांच्या मर्यादेपर्यंतच ठेवण्याचा निर्णय घेतला, तर अशा परिस्थितीत ‘हातात मिळणारे वेतन’ प्रत्यक्षात वाढू देखील शकते.
या नवीन नियमांचा सर्वात महत्त्वपूर्ण परिणाम अशा तरुण व्यावसायिकांवर होईल, ज्यांनी नुकतीच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. ‘TeamLease RegTech’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO ऋषी अग्रवाल यांच्या मते, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या व्यावसायिकांची salary structure ही सहसा टॅक्स बचतीच्या दृष्टीने फारशी ऑप्टिमाइज्ड नसते आणि ती स्वरूपतः fixed असते. जरी वाढीव PF योगदानामुळे सुरुवातीला त्यांच्या टेक-होम सॅलरी किंचित घट झाली, तरीही त्यांच्या ग्रॅच्युइटी आणि Provident Fund मध्ये होणारी दीर्घकालीन वाढ हे wealth creation चं एक शक्तिशाली साधन ठरेल. चक्रवाढ व्याजाचा प्रभाव या वयोगटासाठी सर्वाधिक प्रभावी असतो; ज्यामुळे निवृत्तीच्या वेळेपर्यंत एक मोठा आर्थिक निधी (corpus) उभारणे त्यांना शक्य होईल.
हा बदल मध्यम-स्तरीय आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. साधारणपणे, वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक मोठा भाग हा ‘व्हेरिएबल पे’ म्हणजेच बदलतं वेतन, इंसेंटिव्स आणि इतर भत्त्यांनी बनलेला असतो. तज्ज्ञ मुरली यांच्या मते, “उच्च उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः ज्यांच्या एकूण मोबदल्यामध्ये ‘व्हेरिएबल पे’चा वाटा लक्षणीय असतो. हा बदल अल्पकाळासाठी त्यांच्या ‘टेक-होम सॅलरी’मध्ये म्हणजेतच हातात मिळणाऱ्या वेतनात कपात होण्यास कारणीभूत ठरू शकतो; कारण आता त्यांच्या एकूण मोबदल्याचा एक मोठा भाग त्यांच्या ‘Fixed Pay’मध्ये समाविष्ट केला जाईल.” मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे, कर्मचारी आणि कंपनी या दोघांच्याही भविष्य निर्वाह निधीतील (PF) योगदानात वाढ होईल, ज्यामुळे दरमहा हातात मिळणारी निव्वळ रक्कम कमी होईल. तथापि, याची दुसरी बाजू अशी आहे की, राजीनामा देताना किंवा निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या ‘ग्रॅच्युइटी’च्या रकमेत मात्र लक्षणीय वाढ होईल.






