इचलकरंजी: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने ,एम. आय. डी. सी. , महापालिका तसेच इचलकरंजी शहरातील प्रोसेस मधून थेट दुषित पाणी पंचगंगा व वारणा नदीत सोडण्यात येत असल्याने दोन्हीही नद्यामधील पाणी प्रदूषित झाले असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत असून सदर बाब जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळातील अधिकारी जिल्ह्यातील प्रदुषण करणा-या कारखान्यांवर कारवाई न करता अधिका-याकडून कारवाईचा फार्स केला जात आहे. विशेषता जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून स्पेंट वॅाश , मळीमिश्रीत पाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे. इचलकरंजी शहरातील अनेक प्रोसेस धारकाकडून केमिकलयुक्त पाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे.
नवीन नियमानुसार त्यांना झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज) प्रकल्प राबविण्यास सांगण्यात आले आहे. मात्र अनेक प्रोसेस धारकाकडून प्रक्लपाचा कमी डिस्चार्ज दाखवून जादा डिस्चार्ज सोडल्याने यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही.जिल्ह्यातील नद्या प्रदुषणाबाबत प्रशासन व शासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे असून कारवाईचा फार्स करून प्रदुषण महामंडळातील अधिकारी जिल्ह्यातील कारखानदाराकडून हप्ते गोळा करण्यापुरते मर्यादित राहिले आहेत. ऐन उन्हाळ्यात नदी पात्रातील पाणी कमी होवू लागल्याने प्रदुषणाचा प्रश्न गंभीर होणार असून कावीळसारखे अनेक साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.
साखर कारखाने ,एम. आय. डी. सी. , महापालिका तसेच इचलकरंजी शहरातील प्रोसेस मधून थेट केमिकलचे दुषित पाणी पंचगंगा नदीत सोडल्याने परिसरातील पिके , भाजीपाला व इतर घटकावर मोठा परिणाम झाला आहे. लेड , अल्काईन , फॅास्परस यासारख्या केमिकलचे अंश पाणी , माती , भाजीपाला मध्ये आढळून आले असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी पंचगंगा नदीकाठावरील पाणी , माती , भाजीपाला यांची तपासणी करून याबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी सदरचा तपासणी अहवाल शासनास सादर करणे गरजेचे असल्याची मागणी यावेळी शेट्टी यांनी केली.