कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याने ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श; वाईत भाविकांची गर्दी
धोम धरणातून शुक्रवार (३१ जुलै) रोजी रात्री सुमारे ८ वाजता ७,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यानंतर पुराचे पाणी महागणपती मंदिरापर्यंत पोहोचले आणि गणरायाच्या चरणांना स्पर्श करून मंदिर परिसराला वेढा दिला. पाण्याचा वेढा असूनही अनेक भाविक सुरक्षित अंतरावरून गणरायाचे दर्शन घेताना दिसत आहेत.
वाई तालुक्यात अशी श्रद्धा आहे की, कृष्णामाईचे पाणी ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श करते, तेव्हा तालुक्यातील पाणीटंचाई दूर होऊन समृद्धीचे संकेत मिळतात. त्यामुळे यंदाही पुराच्या या घटनेकडे अनेकांनी श्रद्धेने पाहिले असून, समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुरामुळे कृष्णा नदीतील मोठ्या प्रमाणावरील जलपर्णी वाहून गेल्याने नदीपात्र स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक मानली जात आहे.
महागणपती मंदिरालगतचा पूल काही काळ पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पर्यायी पुलावर वळवावी लागली. परिणामी शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. उपलब्ध मनुष्यबळ मर्यादित असल्याने पोलिसांवर अतिरिक्त ताण जाणवत होता.
पूराच्या पाण्याचा फटका मंदिर परिसरातील व्यावसायिकांनाही बसला आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकाने बंद ठेवावी लागली. व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलवला असला, तरी काही दिवस व्यवसाय ठप्प राहण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महागणपती मंदिरालगतच्या पुलाची उंची वाढविणे, पुलावरील अतिक्रमणे हटविणे आणि भविष्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. श्रद्धा, निसर्ग आणि प्रशासनाच्या आव्हानांचा संगम अनुभवायला मिळालेल्या या पुरामुळे वाईकरांना एकीकडे समाधानाचा भाव मिळाला असला, तरी दुसरीकडे पूरनियोजन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीची गरजही पुन्हा अधोरेखित झाली आहे.






