एक ते दीड किमी रस्ता चिखलाने व्यापला; बुलेट ट्रेनच्या कामामुळे नागरिकांची जीवघेणी कसरत
दुचाकीस्वारांनाही या चिखलमय रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. चिखलामुळे वाहनांचे संतुलन बिघडून वारंवार अपघात होत असून अनेक वाहनचालक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तसेच वाहनांच्या चाकांमधून उडणाऱ्या चिखलामुळे नागरिकांचे कपडे खराब होत असून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक रहिवाशांनी संबंधित यंत्रणांकडे अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप केला आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून चिखल हटवावा, तसेच वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांमुळे परिसरातील वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुंबईतील भुयारी मार्गाच्या कामाला वेग आला असून, घणसोली ते शिळफाटा दरम्यानचे ४.८ किलोमीटरचे भुयारी खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हे काम ‘एनएटीएम’ (New Austrian Tunnelling Method) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. मुंबईतील सुमारे २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी दोन अत्याधुनिक तंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामध्ये ‘टीबीएम’ (Tunnel Boring Machine) आणि ‘एनएटीएम’ (New Austrian Tunnelling Method) या पद्धतींचा समावेश आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून खोदकाम सुरू आहे.
घणसोली ते शिळफाटा हा टप्पा ‘एनएटीएम’ पद्धतीने पूर्ण करण्यात आला आहे. या तंत्राचा वापर प्रामुख्याने कठीण भूभाग, खडकाळ रचना आणि बदलत्या भूगर्भीय परिस्थितीत सुरक्षित व अचूक खोदकामासाठी केला जातो. दरम्यान, विक्रोळी ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील बुलेट ट्रेन स्थानकापर्यंतचा भुयारी मार्ग ‘टीबीएम’ (Tunnel Boring Machine) द्वारे तयार केला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक कटरहेड (Cutterhead) विक्रोळी येथील शाफ्टमध्ये यशस्वीरित्या उतरवण्यात आला असून, लवकरच या टप्प्यातील खोदकामाला वेग मिळणार आहे.






