फोटो - टीम नवराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये पोलीस भरती सुरु असून त्याच्यावर पावसाचे मोठे सावट आहे. यामुळे आधीच परिक्षार्थी वैतागलेले असताना आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा फटका देखील पोलीस भरतीला बसला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते लाडकी बहीण योजनेसाठी प्रचार करणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यामुळे संभाजीनगरची पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. यामुळे हजारो उमेदवारांना मोठा त्रास झाला आहे. यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
संभाजीनगरमध्ये आज पोलीस भरती घेण्यात येणार होती. साधारणतः अडीच हजार उमेदवार या चाचणी देणार होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा असल्यामुळे सर्व पोलिसांना बंदोबस्ताचे काम लावले आहे. यामुळे भरती घेण्यासाठी पोलीस उपलब्ध नसल्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “संभाजीनगरमध्ये पोलीस भरती असताना देखील अडीच हजार मुलांना परत पाठवले आहे. अडीच हजार मुले येतात त्यांना लागणारा खर्च आणि यामुळे त्यांना झालेला त्रास याकडे कोणी लक्ष देणार आहे का? पोलीस आयुक्तांना सांगितले की भरती बंद व चालू होती. पोलीस आयुक्तांना सांगितले म्हणजे संपूर्ण झाले का? राज्यात रझाकारी शासन सुरू आहे का? कोणाच्या राजकारणासाठी होतकरू तरुणांच्या खिश्यांना कात्री मारणारे पोलिस खाते या मुलांचा खर्च देणार का?” असे महत्त्वपूर्ण प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केले आहेत.
योजनेप्रमाणे अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री
त्याचबरोबर अब्दूल सत्तार यांच्यावर देखील अंबादास दानवे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, “लाडकी बहीण योजनेची मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात करत आहे. मात्र हे दुर्दैवी असे आहे अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचा उल्लेख कसा केला होता हे सगळ्यांना माहिती आहे. मला आठवते सत्तार ठाकरे सरकार मध्ये होते तेव्हा त्यांनी एका शेतात हनुमानाबद्दल काय शिवीगाळ केली होती ते भाजपने बाहेर आणली होती. भाजप ज्येष्ठ नेते दानवे सिल्लोडला पाकिस्तान म्हणाले होते. आता राज्य सरकारचा ज्या ठिकाणी कार्यक्रम होतो ती जागा पठाण नावाची महिला आहे ती जागा सत्तार यांनी बळकावली आहे. या जागेबाबत न्यायालयाने स्थगिती असताना पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आहे, त्यांच्या बद्दल खटले सुरू आहेत. लाडकी बहीण योजने प्रमाणे अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री झाले आहेत. हिंदुत्व विरुद्ध त्यांनी गरळ ओकत आहे त्यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली आहे, आम्ही हस्तांदोलन केले तर हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात,” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.