महाबळेश्वर एसटीचा 'राम भरोसे' प्रवास अखेर संपला! १० नव्या 'राजमाता जिजाऊ' बसेस दाखल
महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असूनही येथील एसटी प्रशासनाने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना वाऱ्यावर सोडले होते . जुन्या, खिळखिळ्या गाड्या आणि बसेसची तीव्र टंचाई यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते . पर्यटन हंगामात तर बसेस अपुऱ्या पडत असल्याने पर्यटकांचे अतोनात हाल होत होते. यासाठी दोन्ही शिवसेनेच्या गटांनी अनेकवेळा आंदोलने केली, लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या केल्या, पण प्रत्येक वेळी पोकळ आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नव्हते. अखेर जनतेच्या मागणीची शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेतल्याने १० नवीन बसेस मंजूर होऊन ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर आगारात या १० नवीन आणि सुसज्ज बसेसचे पूजन आज अत्यंत उत्साहात पार पडले यावेळी ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते केक कापून एसटी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या नवीन गाड्या ताफ्यात आल्यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांमध्ये आणि हताश झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आता कुठे काही अंशी आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे .
महाबळेश्वरचा डोंगराळ भाग आणि वळणावळणाचे धोकादायक घाट रस्ते पाहता, जुन्या गाड्यांमुळे अपघाताची टांगती तलवार असायची. मात्र, आता दाखल झालेल्या या नवीन बसेस अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आणि अत्यंत आरामदायी आहेत त्यामुळे या वळणावळणाच्या घाटांमधून प्रवास करताना प्रवाशांचा आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि सुसह्य होणार आहे यात शंका नाही.
या बस पूजन कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे राजेंद्र राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले, उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय शेलार, प्रवीण भिलारे,आगार व्यवस्थापक महेश जाधव, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्राजक्ता मोहिते, आगार लेखाकार महेश शिंदे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक जयवंत केदार, वाहतूक निरीक्षक शाहरुख खान, तसेच किरण धुमाळ,गणेश उतेकर, मेघा चोरगे, सतीश ओंबळे, विजय नायडू यांसह स्थानिक नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कित्येक दिवसांची प्रतीक्षा संपवून महाबळेश्वरकरांना हक्काच्या गाड्या मिळवून दिल्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.






