मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border) पुन्हा एकदा पेटला आहे. याशिवाय, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा बेळगाव दौरा (Belgaon Tour) रद्द झाल्यानंतर राजकीय वातावरणही तापले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्याकडूनही वादग्रस्त वक्तव्ये सुरूच असून बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना सूचक इशारा दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले, मी मध्यंतरी बोललो तसे महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालत आहे, हे तर उघड दिसते. पण इथे कोण याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तत्काळ थांबवा.
सीमाप्रश्न प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचे उत्तर पण तितकेच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळले जात आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवते कर्नाटकात आहेत, तर अनेक कन्नडिगांची कुलदैवते महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचे हित आहे.