विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग, इच्छुकांची गर्दी, अर्ज दाखल मात्र शून्य
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुकांकडून जोरदार चाचपणी सुरू झाली आहे. भाजपकडे स्पष्ट संख्याबळ असतानाही पहिल्याच दिवशी पक्षाकडून एकही अर्ज न घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पहिल्या दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून २, शिवसेना (शिंदे गट) ४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ३, राष्ट्रीय समाज पक्ष १, बहुजन समाज पार्टी १ आणि अपक्षांकडून ३ अर्ज घेण्यात आले.
विधानपरिषद निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी १४ अर्ज विकले गेले असले तरी भाजपकडून एकही अर्ज उचलला गेला नाही. ६१६ पैकी ३०७ मते असलेल्या भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिंदे गटाकडून सर्वाधिक ४ तर ठाकरे गटाकडून ३ अर्ज घेण्यात आले आहेत. दोन्ही गट स्वतंत्रपणे ताकद आजमावणार की महायुती-महाविकास आघाडीचे गणित जुळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
९६ मते असलेल्या काँग्रेसकडून २ अर्ज घेण्यात आले आहेत. मात्र पक्ष स्वतःचा उमेदवार देणार की अन्य पक्षाला पाठिंबा देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रीय समाज पक्ष व बहुजन समाज पार्टीनेही प्रत्येकी एक अर्ज घेतल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. अपक्षांकडूनही ३ अर्ज घेतले गेल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
आचारसंहिता कालावधी : २५ मे ते २५ जून २०२६
मतदान : १८ जून २०२६मतदार संख्या : ६१६ (नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य)






