सुशांत शेलार यांची सुषमा अंधारे यांच्यावर आगपाखड
राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीने लक्ष वेधले आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आणि दमदाटीचा आरोप केला आहे. मंत्री उदय सामंत यांची पत्नी नीलम सामंत यादेखील या निवडणुकीत उभ्या राहणार आहेत. यामुळे आता राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून उदय सामंत आणि नीलम शिर्के यांच्यावर टीका केली असता आता अभिनेता सुशांत शेलार यांनी अंधारेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सुषमा अंधारे यांनी याप्रकरणावरून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केली. त्या यावेळी म्हणाल्या, “मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली. विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला सुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते जे अतिशय गंभीर आहे. नेते अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे पण नेते अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्र ही बळकावत असतील तर मात्र दुर्दैवी आहे!”
सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रियेनंतर आता अभिनेते सुशांत शेलार यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. सुषमा अंधारे यांना लक्ष करत ते यावेळी म्हणाले, “नीलम शिर्के या अभिनेत्री असल्याने त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. सुषमा अंधारे तुम्हीसुद्धा अभिनेत्री व्हा आणि तुम्हीसुद्धा उमेदवारी अर्ज भरा. मान अशी तशी केल्यामुळे आपण स्वतःला अभिनेत्री समजता का?” असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सुशांत शेलार यांनी महामंडळाचे माजी संचालक विजय पाटकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. ते यावेळी म्हणाले, “विजय पाटकर यांचे संचालकपद न्यायालयाने रद्द केले आहे. एका मंत्र्याने अर्ज भरताना दबाव टाकल्याचं त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. पाटकरांनी खोटे आरोप करू नयेत.” विजय पाटकरांच्या कार्यकाळात मनाचा मुजरा कार्यक्रमात भ्रष्ताहार झाल्याचे आरोप करत शेलार पुढे म्हणाले, “१५ ते १६ लाखांत होणारा कार्यक्रम तब्बल ५२ लाख रुपयांत करण्यात आलं. तसेच ऑडिटमध्ये १० लाख ७८ हजारांचा फरक आढळला,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
“महागाई मानव मोदी” यांचा देशावर पुन्हा हल्ला…” वाढत्या इंधन दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आणि दमदाटी होत असल्याचा गंभीर आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील एका मंत्र्यांचा आणि त्याच्या ओएसडीचा त्यांच्यावर दबाव असल्याचा तसेच त्यांना निवडणुकीसाठी अर्जदेखील भरून दिला नाही असा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत बोलताना विजय पाटकर म्हणाले, “मागील ४० वर्ष आम्ही इंडस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं? नीलम शिर्के अध्यक्षा होत असतील तर होउदे. पहिल्यांदा अध्यक्ष होईल. ती माझी मैत्रीण आहे. मी पॅनल उभा करेल म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.






