महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल मंदावली; पुढील तीन दिवसांत प्रगतीची शक्यता, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
Monsoon News: देशासह राज्यातील काही भागांमध्ये मान्सूने हजेरी लावली आहे. तळकोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासी मिळाला होता. पण उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास सध्या स्थिरावला असून, पुढील तीन दिवसांत तो राज्यातील आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे पार करत रत्नागिरी, सातारा आणि सोलापूरपर्यंत जोरदार पाऊसही झाला. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनला सुरूवात झाल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र त्यानंतर पावसाचा वेग मंदावला आहे. सध्या मान्सूनची सीमा रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, सोलापूर, कर्नाटकातील कलबुर्गी, आंध्र प्रदेशातील नांदयाल, तमिळनाडूतील चेन्नई आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुरीपर्यंत पोहोचली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मॉन्सूनपूर्व सरी आणि हलका पाऊस सुरू असला तरी राज्यातील अनेक भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या पडणारा पाऊस हा सातत्यपूर्ण मान्सूनचा नसून पूर्वमोसमी आणि वादळी स्वरूपाचा आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भासह राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील काही भागांमध्येही तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
Maharashtra Politics : राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज; म्हणाले, ‘काही जण कष्ट
खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या प्रगतीकडे लागले आहे. अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीमुळे मान्सूनने संपूर्ण ईशान्य भारत आणि सिक्कीम व्यापले आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागातही मान्सून दाखल झाला आहे. मात्र अरबी समुद्रातील अनुकूल वातावरणाचा अभाव असल्याने महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती मंदावल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, संपूर्ण तमिळनाडू तसेच छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. राज्यातील नागरिक आणि शेतकरी आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेवून आहेत.






