कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन; 'या' मागण्यांसाठी तरुणाई आक्रमक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुणे : देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि प्रवेश परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांविरोधात कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. त्यानुसार, आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला आहे.
पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि स्पर्धा परीक्षार्थीचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला. यासाठी संबंधित यंत्रणांसह केंद्रीय शिक्षण मंत्रालयालाही जबाबदार धरले पाहिजे, असे ते म्हणाले. दिपके यांनी सांगितले की, ६ जून रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला असून, आता ११ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे.
पुण्यात आज आंदोलन
पुण्यातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे असे ते म्हणाले. पुण्यातील आंदोलनानंतर लखनौ, जयपूर, अमृतसरसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्धचे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी झालेल्या निदर्शनांबद्दल बोलताना अभिजीत यांनी सांगितले की, नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेले त्यांचे आंदोलन यशस्वी ठरले आणि त्याला ७,००० लोकांचा पाठिंबा मिळाला. आता हे आंदोलन देशभर विस्तारले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
घरी परतताच स्वागत
जंतर-मंतरवरील आंदोलन संपल्यानंतर अभिजीत दीपके आपल्या घरी परतले; महाराष्ट्रातील छत्रपती जिल्ह्यात त्यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले होते. परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, याचा पुनरुच्चार करत त्यांनी जोर दिला की, ही एक देशव्यापी मोहीम असेल आणि राजीनामा मिळेपर्यंत ते माघार घेणार नाहीत.






