पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; आर्थिक मदत न मिळाल्यास लालपरीची चाके थांबणार?
मुंबई : दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांची, जीवनवाहिनी असलेल्या आणि ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित एसटी महामंडळ अभूतपूर्व आर्थिक संकटातून जात असल्याने ती वाचविण्यासाठी राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. या लढ्याचे नेतृत्व परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वतः करावे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केले.
बरगे म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एसटी महामंडळाचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाला आहे, तर वैधानिक देणी आणि थकीत रकमेचा आकडा ७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गर्दीचा हंगाम आणि भाडेवाढ असूनही यंदाच्या मे महिन्यात एसटीला ५० कोटी ६३ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला, विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत महामंडळाने १८ कोटी २२ लाख रुपयांचा नफा नोंदविला होता.
या आर्थिक अडचणीच्या काळात राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची जबाबदारी महामंडळाची असल्याचे स्पष्ट केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली असून, ८६ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था धोक्यात आल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.
एसटीच्या इतिहासाचा दाखला देताना बरगे यांनी सांगितले की, पूर्वी संकटाच्या काळात तत्कालीन अध्यक्ष पी. के. अण्णा पाटील, गिरीश बापट यांनी एसटीची पाठराखण केली होती. तसेच, मॅक्सी कॅबच्या स्पर्धेमुळे एसटीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना तत्कालीन अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी स्वतः आंदोलनात सहभागी होत नेतृत्व केले होते.
आज पुन्हा तशीच निर्णायक परिस्थिती निर्माण झाली असून, एसटी वाचविण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून लोकचळवळ उभी राहणे आवश्यक असल्याचे बरगे यांनी म्हटले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.






