फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIT Foreign Language Courses: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) देश आणि जगभरात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आता अनेक आयआयटी आपल्या विद्यार्थ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी विदेशी भाषा अभ्यासक्रमही चालवत आहेत. या कोर्सचा उद्देश केवळ नवीन भाषा शिकवणे हा नसून, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संस्कृती, जागतिक संधी आणि बहुभाषिक कौशल्यांशी जोडणे हा आहे. अनेक कार्यक्रम ऑफलाइन तसेच ऑनलाइन स्वरूपातही उपलब्ध आहेत, ज्यामुळे देशभरातील लोक याचा लाभ घेऊ शकतात.
देशातील विविध आयआयटी कॅम्पसमध्ये फ्रेंच, जर्मन, जपानी, मंदारिन (चिनी भाषा) आणि संस्कृत यांसारखे भाषा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या कोर्सेसचे संचालन प्रामुख्याने संस्थांच्या ह्युमॅनिटीज विभागामार्फत किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स ऑफिसद्वारे केले जाते. अनेक कोर्सेस बेसिक आणि एडव्हान्सड पातळीवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे नवीन आणि अनुभवी अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना जोडता येते.
आयआयटी कानपूर त्यांच्या फॉरेन लँग्वेज प्रोग्राम अंतर्गत फ्रेंच, जर्मन आणि जपानी भाषेचे कोर्सेस घेते. हे कोर्सेस बेसिक आणि एडव्हान्सड अशा दोन्ही स्तरांवर उपलब्ध आहेत. यामध्ये विद्यार्थी, संस्थेचे कर्मचारी आणि बाहेरील उमेदवारही अर्ज करू शकतात. वर्ग ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून चालवले जातात. कोर्स पूर्ण करणाऱ्या सहभागींना संस्थेमार्फत प्रमाणपत्रही दिले जाते.
आयआयटी दिल्लीच्या इंडियन अँड फॉरेन लँग्वेज लर्निंग प्रोग्राम अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये फ्रेंच, जर्मन आणि जपानी भाषा शिकवल्या जात आहेत. हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि बाहेरील उमेदवारांसाठीही खुला आहे.
दुसरीकडे, आयआयटी बॉम्बे सर्वाधिक भाषा पर्याय देणाऱ्या संस्थांमध्ये समाविष्ट आहे. येथे फ्रेंच, जर्मन, जपानी, मंदारिन आणि संस्कृत यांसारख्या भाषांचे कोर्सेस उपलब्ध आहेत. हे वर्ग संध्याकाळच्या वेळी आयोजित केले जातात आणि प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झाल्यावर सहभागींना प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
जे विद्यार्थी घरबसल्या विदेशी भाषा शिकू इच्छितात, त्यांच्यासाठी आयआयटी मद्रासने NPTEL आणि SWAYAM प्लॅटफॉर्मवर जर्मन भाषेचे तीन स्तरांचे ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. या कोर्सेसमधील प्रवेश विनामूल्य आहे. मात्र, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना १,००० रुपये शुल्क देऊन प्रॉक्टर्ड परीक्षा द्यावी लागेल.
आयआयटी खडकपूर आपल्या विद्यार्थ्यांना पर्यायी विषय म्हणून जर्मन भाषा शिकवते. याशिवाय, संस्था NPTEL द्वारे ऑनलाइन स्पोकन संस्कृत कोर्सही चालवते. तर आयआयटी हैदराबादने केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या सहकार्याने संस्कृतचा प्राथमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. या कोर्समध्ये भाषेचे कोणतेही पूर्वज्ञान नसलेले लोकही प्रवेश घेऊ शकतात.
विदेशी भाषा शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ नवीन भाषेचे ज्ञानच मिळत नाही, तर जागतिक कंपन्यांमध्ये नोकरी, उच्च शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधीही वाढतात. आयआयटी आता पारंपारिक STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स) शिक्षणाच्या पुढे जाऊन बहुभाषिक कौशल्ये, सांस्कृतिक आदान-प्रदान आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन देत आहेत. यामुळेच अभियांत्रिकीसोबतच भाषा शिक्षणही आता विद्यार्थ्यांच्या करिअरला नवीन दिशा देण्याचे माध्यम बनत आहे.






