BMC Election Result 2026: फडणवीसांची रणनीती यशस्वी! मानखुर्द वॉर्ड 135 मध्ये भाजपचा झेंडा, नवनाथ बन यांनी मारली बाजी
विशेष म्हणजे नवनाथ बन पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक लढवत होते. महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना यश मिळाले आहे. खरं तर नवनाथ बन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तसेच नवनाथ बन पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक लढवत असल्याने त्यांच्या उमेदवारीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात होते. मात्र आता मानखुर्द परिसरातील वॉर्ड 135 मधून नवनाथ बन यांनी बाजी मारल्यानंतर सर्वत्र विजयाचा गुलाल उधळला जात आहे.
भाजपाचे विजयी उमेदवार नवनाथ बन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. खरं तर ठाकरे गटाच्या संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात नेहमीच आघाडीवर असणारे अशी नवनाथ बन यांची ओळख आहे. जेव्हा भाजपने मुंबईत नवनाथ बन यांची उमेदवारी जाहीर केली, त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्दमधील वॉर्ड क्रमांक 135 मधून नवनाथ बन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेचा विजय झाला होता. मात्र यंदा भाजपाने बाजी मारली आहे. (फोटो सौजन्य – X)
वॉर्ड क्रमांक 214 मधून रिंगाणात असलेल्या भाजपाच्या अजय पाटील यांनी विजय मिळवला आहे. तर वॉर्ड क्रमांक 215 मधून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे संतोष ढाले विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. तर वॉर्ड क्रमांक 1 मधून रेखा यादव विजयी झाल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 193 मधून ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर यांनी बाजी मारली आहे.
प्रभाग क्रमांक १३४ मध्ये एमआयएमचे मेहजबीन खान विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक ५१ मधून शिवसेनेच्या वर्षा टेंबवलकर यांनी विजय मिळवला आहे. वॉर्ड क्रमांक ५० मधून भाजपाचे राजपूत प्रतापसिंह विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 72 मधून भाजपाचे ममता यादव विजयी झाले आहेत. तसेच वॉर्ड क्रमांक 135 मधून भाजपाचे नवनाथ बन विजयी झाले आहेत.






