Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरातील पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने आज 20 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये पुणे आणि सातारा यांचा देखील समावेश आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, तसेच हिगोंली आणि परभणी या भागांमध्ये आज ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकते, असे देखील सांगण्यात आले आहे. खरं तर, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय
मुंबई आणि ठाण्यातील सततच्या पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतूकीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्ते वाहतूक मंदावली असून रेल्वे वाहतूक देखील उशीराने सुरु आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा 10 ते 15 मिनिटांनी उशीराने सुरु असल्याचे सांगितलं जात आहे. तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक देखील 5 ते 10 मिनिटे उशीराने धावत आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तर कल्याण आणि डोंबिवली या भागांमध्ये देखील पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुदेव हॉटेल रोड आणि आंबेडकर रोड परिसरात पावसाचे साचण्यास सुरुवात झाली आहे.






