रस्त्यांसाठी पालिकेचा मेगा प्लान! सातही परिमंडळांत जेटिंग वॉटर टँकर भाड्याने घेणार; १५० दिवसांचे कंत्राट
मुंबईतील धुळीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि रस्ते स्वच्छ सुंदर राखण्यासाठी मुंबई महापालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील सर्व सातही परिमंडळांमध्ये रस्ते धुण्यासाठी आधुनिक ‘जेटिंग व्यवस्था’ असलेले पाण्याचे टैंकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी ई-निविदा जाहीर केल्या आहेत. पावसाळा वगळून एकूण १५० दिवसांच्या कालावधीसाठी हे कंत्राट दिले जाणार आहे.(फोटो सौजन्य – AI)
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाहनांची वर्दळ आणि ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे हवेची गुणवत्ता कमालीची खालावते. अशा परिस्थितीत पारंपरिक पद्धतींऐवजी हाय-प्रेशर जेटिंग वॉटर टँकर वापरणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हे टँकर तीव्र पाण्याच्या माऱ्याने रस्त्यांच्या कडेला आणि दुभाजकांवर साचलेली सूक्ष्म धूळ व माती पूर्णपणे उपसून काढतात. यामुळे डांबरी व सिमेंटचे रस्ते चकाचक तर होतीलच, शिवाय हवेतील घातक तरंगते कण जमिनीवर बसून मुंबईकरांना श्वसनाच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेने सर्व सातही परिमंडळांसाठी वेगवेगळ्या प्रभागांनुसार सुट्या निविदा काढण्याऐवजी परिमंडळ स्तरावर एकत्रित प्रक्रिया राबवली आहे. यामुळे प्रशासकीय कामात मोठी सुसूत्रता येणार असून वेळेचीही बचत होणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कंत्राट दिले गेल्याने पालिकेचा खर्च मर्यादित राहून स्पर्धात्मक दरांचा फायदा होईल आणि संपूर्ण मुंबईत एकाच दर्जाची साफसफाई सुनिश्चित करणे शक्य होईल.
आरे परिसरात समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे जंगल निर्माण करणार; आशिष शेलार
या कामासाठी विविध नामांकित कंपन्या, भागीदारी संस्थांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. जे कंत्राटदार पालिकेकडे नोंदणीकृत नाहीत, त्यांना कंत्राट मिळाल्यापासून ३ महिन्यांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक राहील, अन्यथा त्यांची बयाणा रक्कम जप्त केली जाईल.कंत्राटदारांना प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र स्कुटिनी फी भरावी लागेल, तसेच इच्छुक कंत्राटदारांना मागील सात वर्षांत सरकारी क्षेत्रात अशाच कामाचा अनुभव आणि परिमंडळनिहाय आर्थिक उलाढाल असणे बंधनकारक आहे.विशेष म्हणजे पारदर्शकता आणि कामाचा दर्जा राखण्यासाठी या निविदेत ‘जॉइंट व्हेंचर’ला पूर्णपणे परवानगी नाकारण्यात आली आहे.






