पंढरपूर : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माढ्याच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे, परंतु आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
यंदा माढा लोकसभा मतदारसंघातून माळशिरसचे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी मोहिते पाटील परिवार अतिशय आक्रमक दिसून आला. ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेऊन धर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जोर लावल्याचे पाहायला मिळाले.
२०१९च्या निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांनी मोहिते पाटील भाजपत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी मोहिते पाटील गटाने भाजपला दिलेल्या शब्दांनुसार माळशिरस तालुक्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तब्बल एक लाख १३ हजार इतके मताधिक्य दिले होते. त्या जाेरावर नाईक निंबाळक निवडून आले. बदलत्या परिस्थितीत आमदार शिंदे व नाईक निंबाळकर यांच्यात जवळीक तर माेहिते-पाटील व नाईक निंबाळकर यांच्यात दुरावा निर्माण झाला.
नाईक निंबाळकर यांचे तिकिट कापून माेहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा हाेती. मात्र पुन्हा उमेदवारी मिळाल्याने धैर्यशील माेहिते पाटील काेणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहिते पाटील गटासमाेर मोठा पेच
कार्यकर्त्यांनी यंदा धैर्यशील मोहिते पाटील हेच आपले खासदार असतील अशी बॅनरबाजी केल्याचे दिसून आले. यंदा काही करून लोकसभेची उमेदवारी मिळवायचीच अशा भूमिकेत मोहिते पाटील परिवार होता. परंतु आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.