यावेळी मार्गदर्शन करताना आ. प्रविण दरेकर म्हणाले कि, हा कार्यक्रम नवी मुंबईसाठी महत्वाचा आहे. आपला उत्साह पाहिल्यावर स्वयं पुनर्विकास ही नवी मुंबईकरांची गरज असल्याचे दिसून येतेय. स्वयं पुनर्विकास आज होत नाही. मी फक्त त्याला आकार देण्याचे काम केलेय. विकासकाच्या हातात गेलेला भाग सभासदांच्या हातात आणण्यासाठी शासकीय योजना उभी केली. स्वयं पुनर्विकासाला रचनात्मकसाच्यात बसविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने मी करत असल्याचेही दरेकर म्हणाले.दरेकर पुढे म्हणाले की, मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबईत ही योजना सुरु केली, कर्ज धोरणही आणले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या काळात स्वतः लक्ष घालून शासन दरबारी परवानग्या देण्याचे काम केले. जिथे जिथे अडचणी आल्या तिथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन केले. अशा प्रकारे २-३ प्रकल्प यशस्वी झाले. परंतु कायदा, शासन निर्णय होणे गरजेचे होते.
यासाठी गोरेगाव येथे हौसिंगची परिषद घेतली. त्या परिषदेत तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १८ मागण्या केल्या. त्यापैकी १६ मागण्या मान्य करत त्याचे शासन निर्णयही जारी केले व या स्वयं पुनर्विकासाला खरी गती मिळाली. त्यामुळे ही योजना स्थिरावल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्याला मंत्रीपदाचा दर्जाही दिला आहे. नुकतीच म्हाडा कार्यालयात सिडकोचे प्रश्न सोडविण्याबाबत बैठक पार पडली.
नवी मुंबईत स्वयं पुनर्विकास योजना राबविण्यासाठी ९०-९५ टक्के सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही मान्यता दिली आहे. या बैठकीचे मिनिट्स सरकारला जाणार असून नवी मुंबईकरांसाठी चांगला सकारात्मक निर्णय होणार आहे. चांगले काम हातात घेतले तर टप्प्याटप्प्याने यश मिळते. आपणच आपला विकास करून मोठी जागा मिळवायची. यासाठी अनेक सोसायट्यांनी पुढे आले पाहिजे. जी मदत, सहकार्य लागेल ती निश्चितपणे प्राधिकरणाच्या माध्यमातून करू, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी दिला. दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदी आमदार प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने नवी मुंबई को-ऑप हौसिंग फेडरेशनच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला.
दरेकर म्हणाले कि, स्वयं पुनर्विकास हे महाराष्ट्रात क्रांतिकारी पाऊल आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी गेलो असता तिथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जवळ बोलावून स्वयं पुनर्विकास, त्याची प्रक्रिया आणि लोकांना होणाऱ्या फायद्याबाबत विचारणा केली. त्यांना मी सर्व समजावून सांगितले. त्यांनी पुस्तिका पाठवण्याचे सांगितले असता मी स्वतःच पुस्तिका घेऊन येईन असे म्हटले. एवढे कुतूहल स्वयं पुनर्विकासविषयी लोकांना आहे. विकासकाशिवाय सोसायटी उभी राहते व सर्वसामान्यांना मोठे घर मिळते हा हौसिंग सेक्टरमधील चमत्कार असल्याचेही दरेकर म्हणाले.






