'कब तक सहें ये अपमान हम,... तो सब्र का भी अंत होता है'; छगन भुजबळ यांचा शायराना अंदाज कोणासाठी इशारा?
कब तक सहें ये अपमान हम, सुनते-सुनते दिल ही थक जाता है, जब वार हो स्वाभिमान पर हर बार, तो सब्र का भी अंत हो जाता है, चुप रहकर क्या मिलता है आखिर,दिल का दर्द ही बढ़ जाता है, उठानी पड़ती है आवाज़, जब पानी सर से उपर चढ़ जाता है! अशी शायरी म्हणत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मोठं पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ऐनवेळी डावलण्यात आलं. त्यामुळे भुजबळ कमालीचे नाराज असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आज एका वृत्त वाहिनीवर झालेल्या मुलाखतीतही त्यांचा नाराजीचा सूर होता. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण अनेक संकेत दिले आहेत. मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्यामुळे छगन भुजबळ मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चाही आहेत. भुजबळ भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला जातो आहे. या प्रश्नाचं उत्तरही स्वतः छगन भुजबळ यांनी या मुलाखतीत दिलं आहे.
यावेळी भुजबळ म्हणाले की ‘लोक म्हणातायेत भाजपमध्ये जा, समता परिषदेतील काही जण म्हणत आहेत की स्वतःचा पक्ष काढा. प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करत आहेत. समता परिषद ही अखिल भारतीय आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडेही मार्ग मोकळा आहे’, असे संकेत त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधला नाही. मात्र, समीर भुजबळ यांच्याशी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितलं.
Ram Shinde : प्रा. राम शिंदे घेणार विधान परिषद सदस्यांचा ‘तास’; सभापतीपदी एकमताने निवड
समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं आंदोलन करण्यात येत आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या बद्दल अपशब्द वापरण्यात आले. त्यावर भुजबळ म्हणाले, अशा प्रकारच्या आंदोलनाला माझा विरोध आहे. याबाबत मी स्पष्ट केलं आहे की असं आंदोलन करणाऱ्यांशी माझा काहीच संबंध नाही. असं आंदोलन करणारे समता परिषदेचा कार्यकर्ते नाहीत आणि चुकीचं बोलणाऱ्यांनाही पाठींबा नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
छगन भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आणि महायुतीमधीलही ज्येष्ठ नेते. त्यांनीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतलं होतं. खालच्या पातळीवरची टीका सहन केली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावंही त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती, मात्र त्यांची घोर निराशा झाली असून भुजबळ मोठा निर्णय घेतील अशा चर्चा आहेत.