मुंबई : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यथित होऊन त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी थोरात यांचा राजीनामा स्वीकारू नये, असं आवाहन काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केलं आहे. त्याउलट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचाच राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बाळासाहेब थोरात हे संयमी आणि ज्येष्ठ नेते असल्याचंही देशमुख म्हणाले आहेत. नाना पटोले यांच्याविरोधात प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. केंद्रीय नेतृत्वानं या सगळ्यात हस्तक्षेप करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं देशमुख यांचं म्हणणंय. आवश्यकतेनुसार पटोले यांना पदावरुन दूर करावं, अन्यथा प्रदेश काँग्रेसमध्ये अनेक जणांचे राजीनामे पडतील, असा इशाराही त्यांनी दिलाय. तसंच महाराष्ट्रात पंजाबसारखी स्थिती निर्माण होईल, असं सांगत त्यांनी पक्षनेतृत्वाला पंजाबची आठवण करुन दिली आहे.
पटोले यांच्याविरोओधात मोठी आघाडी
नाना पटोले यांच्याबाबत प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. या प्रचंड नाराजी संदर्भात 10 तारखेला मुंबईतील गांधी भवनात एक बैठक पार पडणार असल्याचंही देशमुखांनी सांगितलंय. या बैठकीत राज्यातील काँग्रेसचे सर्व माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांना बोलावले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यावेळी नाना पटोले यांच्यावर नाराज असलेल्या नेत्यांना आपलं मत मांडता येईल. या बैठकीनंतर पक्षातील नेत्यांचं एक शिष्टमंडळ केंद्रीय नेतृत्वाला भेटायला दिल्लीलाही जाईल, अशी शक्यताही देशमुखांनी वर्तवली आहे.
थोरातांचा नव्हे पटोलेंचा राजीनामा घ्या : देशमुख
बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा राजीनामा झाल्यास काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात खूप मोठी हानी होईल. नाना पटोले हे दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले आहेत, त्यामुळं त्यांच्या जाण्याने पक्षाची कुठलीही हानी होणार नाही, असंही देशमुख म्हणालेत. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत मंजूर होऊ नये, असंही ते म्हणालेत. पक्षात अनेक नेते नाराज आहेत, जेव्हापासून नाना पटोलेंविरोधात आवाज उठवला आहे, अनेक कार्यकर्ते आपल्याला संपर्कही करत आहेत. भविष्यात अनेकांचे राजीनामे होऊ शकतात, अशी शक्यताही देशमुखांनी वर्तवली आहे.
मनमानी खपवून घेतली जाणार नाही : पटोले
बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. यानंतर प्रदेश काँग्रेसमधील दुफळी उघड झाली आहे. सत्यजीत तांबे यांच्यानंतर त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या या कृतीनं काँग्रेसमधली गटबाजी अधिक स्पष्ट झाल्याचं मानण्यात येतंय. यावर पटोलेंना विचारणा केली असता, असा राजीनामा आला नसल्याचं त्यांनी म्हटलय. तसचं पक्षात मनमानी सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.