PCMC News:पिंपरी-चिंचवडसह मावळ पट्ट्यात जीवघेणा दमटपणा; उकाड्याने पिंपरीकर त्रस्त
Weather Forecast: जून महिना सुरू होऊनही पुणे आणि आसपासच्या परिसरातील उष्णता आणि दमटपणा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. साधारणपणे या काळात मान्सूनच्या आगमनामुळे हवामान आल्हाददायक होते; मात्र, यंदा मान्सूनला झालेल्या विलंबामुळे पिंपरी-चिंचवड आणि लोणावळ्यासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांसह संपूर्ण मावळ भागाला प्रखर उष्णता आणि जीवघेण्या दमटपणाचा दुहेरी फटका बसत आहे. पिंपरी-चिंचवडः दिवस-रात्र घामाघूम नागरिक; आरोग्यावर विपरीत परिणाम
पिंपरी-चिंचवडमधील नागरिक सध्या दमटपणामुळे निर्माण झालेल्या त्रासाचा सामना करत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिवसाचे तापमान ३५-३६ अंश सेल्सिअसच्या आसपास असले, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने ते ४० अंश सेल्सिअस इतके प्रखर जाणवत आहे. दिवसा अधूनमधून ढगाळ वातावरण आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असल्याने लोकांना चोवीस तास घामाघूम व्हावे लागत आहे.
या असह्य दमटपणामुळे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि त्वचेच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच, वातानुकूलित कार्यालये किंवा घरांमध्ये वेळ घालवणारे लोक बाहेरच्या उष्ण हवेच्या संपर्कात आल्यावर अचानक आजारी पडत आहेत. तापमानातील या अचानक होणाऱ्या बदलांमुळे उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे डॉक्टरांचे सांगितले .
दुपारच्या वेळी उष्णता आणि दमटपणा इतका तीव्र असतो की शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा आणि भाजी मंडई पूर्णपणे ओस पडलेल्या दिसतात. ग्राहकांच्या अभावामुळे अनेक दुकानदारांनी दुपारच्या वेळी दुकाने बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. कामासाठी बाहेर पडणारे लोक टोपी, गॉगल, सन-प्रूफ जॅकेट, स्कार्फ आणि छत्री यांसारख्या संरक्षणात्मक साधनांचा आधार घेत आहेत.






